लोणंद : तरडगाव पांढरी (ता. फलटण) येथील आरती सोमनाथ गायकवाड (वय २३) या महिलेने स्वतःच्या पाच महिन्याच्या मुलाचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून खून केला. एवढेच नव्हे तर मुलाचा मृतदेह घरापासूनच जवळच पुरला, मात्र, या घटनेनंतर पश्चात्ताप झाल्याने तिने स्वत:हून पोलिसांकडे या खुनाचा उलगडा केला.
याबाबत माहिती अशी की, आरती गायकवाड हिने शनिवार, दि. २३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास लोणंद पोलिसांना फोन केला. 'मी माझ्या लहान बाळाला जिवंत मारून पुरले असून तुम्ही लगेच तरडगावला गाडी घेऊन या. नाही तर मी आणखी कोणाचा तरी खून करीन,' असे तिने सांगितले. हे ऐकून लोणंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने तिच्या पाच महिन्यांचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड याला दि. १२ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात ब्लँकेटमध्ये गुंडाळून व उशीने नाक तोंड दाबून खून केल्याचे सांगितले. त्यानंतर मुलाला पुरलेले ठिकाणही तिने सांगितले. घटनास्थळी आरती गायकवाडला नेण्यात आले. पोलीस व डॉक्टरांचे पथकही तेथे पोहोचले. खोदकाम करून त्या मुलाचा मृतदेह बाहेर काढून त्याच ठिकाणी शवविच्छेन करण्यात आले.
आरती गायकवाड हिला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, तिने पोटच्या गोळ्याचा खून कशासाठी केला, हे अद्याप समोर आले नसून पोलीस कसून चौकशी करीत आहेत,
घरच्यांची केली दिशाभूल
आरतीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले. पांढरी तरडगाव येथे ती आपल्या पतीसह राहत आहे. पती सुरवडी येथील कंपनीत काम करतो. तिचे पाहिले मूल साधारण दोन-अडीच वर्षांचे आहे. असे असताना तिने पाच महिन्यांच्या दुसऱ्या मुलाचा खून केला, घरच्यांना बाळ गुदमरुन मेले, अशी माहिती देऊन त्यास पुरले होते.