ढेबेवाडी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून व्यावसायिक युवकाचा खून करणाऱ्या संशयित तीन आरोपींना ढेबेवाडी पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडीनजीक ही घटना घडली होती. बुधवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैभव उत्तम काळे (रा. मालदन), उमर आमिरखान मुल्ला, शुभम प्रकाश खेडेकर (रा. ढेबेवाडी) या तीन संशयित आरोपींचा समावेश आहे.ढेबेवाडीपासून जवळच असलेल्या वांग नदीशेजारी कच्च्या रस्त्यावर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. ऋतुराज दिलीप देशमुख (वय ३१) असे संबंधित खून झालेल्या युवकाचे नाव असून, तो कुसूर (ता. कऱ्हाड) येथील व्यावसायिक असल्याचे स्पष्ट झाले होते. दगडाने ठेचून अमानुषपणे हा खून केला होता. मात्र, घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते.
कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर नदीपासून जवळच असलेल्या रस्त्याला कच्च्या मार्गावर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी रक्ताचा सडा आणि या खुनात वापरण्यात आलेले दगड निपचित पडलेल्या ऋतुराज जवळच पडले होते. या घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले होते.
पोलिसांनी घटनाक्रमाचा अभ्यास करून सीसीटीव्हीच्या आधारावर संशयितांना ओळखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर संशयित आरोपी ज्या दिशेने पळाले होते, त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवल्याने संशयित आरोपी बारा तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात आले.