सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. या कामास लवकरच प्रारंभ होणार असून, प्रकल्पामुळे संग्रहालयाच्या वीजबिलात मासिक सुमारे एक लाख रुपयांची बचतही होणार आहे.केंद्र व राज्य शासनाने पारंपरिक ऊर्जा साधनांचा कमीत कमी वापर करुन अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढविण्यासाठी नवनव्या योजना सुरू केल्या आहेत. याच धर्तीवर संग्रहालयाच्या छतावर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. पुरातत्व विभागाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, ३३ लाख १८ लाखांची तरतूदही केली आहे.संग्रहालयाच्या छतावर पुरेशी जागा उपलब्ध असून, येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. एक किलोवॅट सौर प्रकल्पातून महिन्याला १२० युनिट वीज तयार होते. त्यानुसार ५० किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून महिन्याला ६ हजार युनिट वीज तयार होणार आहे. सध्या संग्रहालयातील वाघनखांसह तख्त, शस्त्र, नाणी ही दालने इतिहासप्रेमींना पाहता येत आहे. नवीन वर्षांत हे संग्रहालय पूर्णपणे सुरू होणार असल्याने विजेची गरजही वाढणार आहे. त्यामुळे संग्रहालयाला हा प्रकल्प लाभदायी ठरणार आहे.
महिन्याला लाखाचे बिलसंग्रहालयातील वाघ नखांसह अन्य दालने सुरू झाल्यापासून वीज वापर वाढला आहे. सध्या संग्रहालयाला मासिक ९० हजार ते १ लाख रुपये इतके वीज बिल येत आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे हे बिल शून्य होणार असून, बीज बिलापोटी वार्षिक सुमारे १२ लाख रुपयांची बचतही होणार आहे.
संग्रहालयातील प्रकाश व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येक ऐतिहासिक वस्तू स्पष्ट दिसावी यासाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था असणे गरजेचे असते. भविष्यात वीज वापरात वाढ होणार आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने सौर प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम विभागाकडून काम लवकर हाती घेतले जाईल. - प्रवीण शिंदे, अभिरक्षक