दहीवडी : ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्यात राष्ट्रवादी शिवसेनेला विश्वासात घेत नाही. राज्यात सत्तेत एकत्र असताना जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला. आमच्याही शेखर गोरे या शिवसेनेच्या वाघाने त्यांच्याविरोधात संचालक पदाची निवडणूक लढवून जिंकली. शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी एकमेकांना कायम विरोध करणारे एकत्र आले. तरीही एकाकी झुंज देत बँकेत प्रवेश केला,’’ असे गौरवोद्गार शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.दहीवडी येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत पदाधिकारी व शिवसैनिकांच्या संवाद दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी निरीक्षक प्रशांत काळे, ठाणेचे नगरसेवक तात्यासाहेब माने, विशाल पावसे, सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे, छाया शिंदे, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, रामभाऊ जगदाळे, शहाजीराजे गोडसे, बाळासाहेब जाधव, महेश गोडसे, राजेंद्र जाधव, वैभव मोरे उपस्थित होते.प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘माण खटाव मतदारसंघात स्वखर्चातून कामे करणारे शेखर गोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत शिवधनुष्य पेलण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करत त्यांनी मतदारसंघात शिवसेना वाढवण्याबरोबरच राज्यात नावलौकिक मिळवलेल्या जिल्हा बँकेतही शिवसेनेचे संचालक म्हणून ते जाऊन बसले आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिल्ह्यात आपल्याला शिवसेनेची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागावे.’जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव म्हणाले, ‘स्वखर्चातून विकासकामे करणारे शेखर गोेरे हे राज्यात एकमेव नेते आहेत. या मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिकांनीही शेखरभाऊंच्या पाठीशी उभे राहावे.’वैभव मोरे म्हणाले, ‘मतदारसंघात शेखर गोरे यांनी आजपर्यंत स्वखर्चातून जनतेची कामे केलीत. प्रत्येक निवडणुका स्वखर्चातून लढवल्यात. माण मतदारसंघात राष्ट्रवादी शिवसेनेला नेहमीच कमी लेखत आहे. आम्ही दोन तीन निवडणुका एकत्र लढवण्यासाठी प्रयत्न केला; परंतु शिवसेनेला कमी समजण्याची मोठी चूक त्यांनी केली. शेखर गोरे यांनी त्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढवून त्यांना शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत पक्षश्रेष्ठी देतील तो मान्य असेल.’
राज्यात आघाडी जिल्ह्यात बिघाडी; शिवसेनेला राष्ट्रवादी विश्वासात घेत नाही - नितीन बानुगडे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 4:16 PM