मलकापूर : आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात मालट्रक पळवून नेताना ट्रक मालकालाच चिरडण्यात आले. हा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी दोन वाजता मलकापूर (ता. कऱ्हाड) येथे घडला. विष्णू शिवाजी हजारे (वय ३५, रा. अहिल्यानगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे ठार झालेल्या ट्रकमालकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय संजय गावडे (वय २७, रा. रेठरे, ता. कऱ्हाड) याच्यावर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मलकापुरातील हॉटेल गंधर्व पॅलेस शेजारी विष्णू हजारे यांचे जयहिंद मोटर गॅरेज आहे. हजारे यांनी गॅरेज व्यवसाय करत करत काही महिन्यांपूर्वी ट्रक विकत घेतला होता. रविवारी दुपारी ट्रक गॅरेजशेजारी उभा करून ते गॅरेजमधील काम करत होते. यावेळी ट्रकच्या व्यवहारातील रक्कम मागण्यासाठी अक्षय गावडे याच्यासह चार ते पाच जण हजारे यांच्या गॅरेजमध्ये आले. त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीवरून बाचाबाची झाली. यावेळी अक्षय गावडे याने ‘पैसे दे, अन्यथा ट्रक घेऊन जातो,’ असे म्हणत ट्रक (एम.एच. १०, ए. डब्ल्यू. ७५७४)मध्ये बसून त्याने ट्रक सुरू केला. तेव्हा ‘कसा नेतोय बघू, म्हणत त्याला अडवत हजारे केबिनमध्ये चढले. सुरू झालेला ट्रक बंद करण्यासाठी ते प्रयत्न करत असतानाच तोल जाऊन हजारे खाली पडले. याचवेळी गावडेने ट्रक सुरू करून पळून जाताना हजारेंच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. ट्रक घेऊन पसार झालेल्या अक्षय गावडेला नागरिकांनी पकडून ठेवले.सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव विभूते, पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे, प्रवीण जाधव, हवालदार धीरज चतूर यांच्यासह कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अक्षय गावडेला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरा त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन महिन्यांत अनेकदा वादआर्थिक देवाण-घेवाणीमधून हजारे व गावडे यांच्यात दोन महिन्यांत अनेक वेळा बाचाबाची होऊन हाणामारीही झाली होती. मात्र, रविवारी दुपारी झालेल्या भांडणात विकत घेतलेल्या ट्रकखालीच विष्णू हजारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.