सातारा : कऱ्हाड येथे आयोजित शिवपुत्र संभाजी महाकाव्य या नाटकाच्या निमित्ताने साताऱ्यात आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह भाजपाचे आ. जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. अनिल बाबर आदी मातब्बरांची भेट घेतली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. भेट राजकीय नसली तरी सर्व पक्षाच्या धुरंदरांची भेट झालीय... मग चर्चा तर होणार ना!विचारधारा कोणतीही असाे, ती समजून घेण्यासाठी पुस्तकासारखा दुसरा गुरू कोण असे ट्वीट पुस्तक दिनानिमित्त करत डॉ. अमोल कोल्हेंनी केले. पण तेवढ्यावरच न थांबता त्यांनी दोन फोटोही अपलोड केले. एक फोटो शरद पवारांचे छायाचित्र असलेले नेमकेची बोलावे हे पुस्तक वाचतानाचा अन् दुसरा फोटो चक्क न्यू बीजेपी हे पुस्तके वाचतानाचा. कुणी काय वाचावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण सोशल मीडियावर अपलोड केला म्हणजे डॉक्टरांना नेमके सांगायचे तरी काय? हा प्रश्न तर पडतोच ना! त्याची चर्चा सुरू असतानाच डॉ. अमोल कोल्हे हे सातारा दौऱ्यावर आले. यावेळी योगायोगाने (योगायोगानेच बरं का!) पालकमंत्री शंभुराज देसाई, शिंदे गटाचेच आमदार अनिल बाबर, भाजपचे आमदार जयकुमार गोरे त्याठिकाणी आलेले. आ. बाळासाहेब पाटील डाॅ. कोल्हेंसोबत होते.विश्रामगृहात सर्व पक्षातील या मातब्बर नेत्यांची भेट झाली. यावेळी गप्पा झाल्या. आ. गाेरेंच्या अपघाताबाबत विचारपूस झाली. फक्त राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. आता पुस्तकांसारखा दुसरा गुरू नाही म्हटल्यावर डॉ. कोल्हे नेमकेची बोलावे, या उक्तीनुसार चाल करणार की न्यू बीजेपी..!
अमोल कोल्हेंची व्यासंगी मुत्सद्देगिरी, पुस्तक दिनानिमित्त ट्वीट केलेल्या फोटोमुळे रंगली चर्चा
By दीपक देशमुख | Published: April 25, 2023 4:30 PM