सातारा : नो पार्किंगच्या ठिकाणची दुचाकी क्रेनमधून नेत असताना एकाने सहायक पोलिस फाैजदाराशी मी साताऱ्यातील मोठा गुंड आहे माहीत नाही का ? असे म्हणत झटापट केली. तसेच त्याच्याजवळ धारदार चाकूही सापडला. हा प्रकार सातारा शहरात घडला. याप्रकरणी संबंधितावर शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी वाहतूक नियंत्रण शाखेतील सहायक पोलिस फाैजदार बाळासो पवार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सॅमसन अन्थोनी ब्रुक्स उर्फ बाॅबी (रा. केसरकर पेठ, सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास साताऱ्यातील पोवई नाका ते मध्यवर्ती बससस्थानक रस्त्यावर हा प्रकार घडला. तक्रारदार हे कर्तव्यावर होते. त्यावेळी नंबर प्लेट नसलेली दुचाकी नो पार्किंगमध्ये उभी केलेली दिसून आलेली होती. ही दुचाकी पोलिस क्रेनमधून नेत असल्याचा राग मनात धरून संशयिताने तुम्ही माझ्या गाडीला हात का लावला. माझे नाव बाॅबी आहे. मी साताऱ्यातील मोठा गुंड आहे माहीत नाही का ? असे म्हटले. तसेच तो तक्रादार यांच्या अंगावर धावून जात झटापट केली. तर तक्रादार पवार यांचे सहकारी हवालदार नवघणे यांनाही शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. यावेळी बाॅबीच्या कमरेला धारदार चाकूही मिळून आला.याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी हवालदार के. ए. जाधव हे तपास करीत आहेत.
वाहतूक पोलिसांनी गाडी उचलली, साताऱ्यातील मी मोठा गुंड म्हणत फौजदाराशी झटापट
By नितीन काळेल | Published: November 03, 2023 12:59 PM