विकास शिंदे मलटण : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण येथील तांबमाळ येथे वखार महामंडळाचे धान्य साठवण इमारतीच्या आवारात येथील सुरक्षा रक्षक व दोन अज्ञात इसम यांनी विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळ मोई, पुणे यांच्या दिंडीतील महिला वारकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. यावेळी वारकऱ्यांनी महामंडळाच्या इमारतीचा रस्ता काटेरी फांद्या टाकून बंद केला. यावरून वारकरी व सुरक्षा रक्षक विजय (पूर्ण नाव नाही) यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दरम्यानच आणखी एका व्यक्तीने वारकऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली व पळून गेले. यातील एकास वारकऱ्यांनी पकडून ठेवले. शिवीगाळ व दगडफेक केल्याने संतप्त वारकऱ्यांनी पुणे-पंढरपूर महामार्गावरच ठिय्या मांडला. जोपर्यंत या सुरक्षारक्षकास पकडून त्यावर कारवाही करत नाही तो पर्यंत महामार्ग मोकळा करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटात पोलिस दाखल झाले. तरीही वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. साधारण अर्धा तास महामार्ग बंद ठेवल्याने दोन्ही बाजुंनी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिक व पोलिस यांनी उचित कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वारकऱ्यांनी महामार्ग खुला केला.
Satara: सुरक्षारक्षकाकडून शिवीगाळ, वारकऱ्यांनी पुणे-पंढरपूर महामार्ग अडवला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:19 AM