सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दहा दिवसांपासून पावसाची दडी असल्याने धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही. त्यातच कोयना धरणात दोन दिवसांपासून आवक बंद झाली आहे. त्यामुळे सध्या ८४ टीएमसीच पाणीसाठा आहे. अजुनही धरण भरण्यासाठी २१ टीएमसीची गरज आहे. मात्र, पावसाअभावी चिंता वाढली आहे.पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. आतापर्यंत पश्चिम भागातच दमदार पाऊस झाला. यामुळे गेल्या दीड महिन्यात धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसह कोयना धरणात चांगला पाणीसाठा वाढला. पण, मागील दहा दिवसांपासून बहुतांशी भागात पावसाची दडी आहे. धरणक्षेत्रातही अत्यल्प पाऊस पडत आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक थांबली आहे. परिणामी पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत नाही. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ९ तर नवजा येथे १३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर महाबळेश्वरला ३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३२६९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला ४३५५ आणि सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ४६४७ मिलीमीटर पडलेला आहे.यंदा या भागात पावसाचे प्रमाण चांगले राहिले असलेतरी धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. कारण, प्रमुख धरणे भरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यातच जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ आहे. सध्या या धरणात ८४.१० टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातच दोन दिवसांपासून धरणातील आवक बंद आहे. हे धरण भरण्यासाठी अजून २१ टीएमसी पाणी लागणार आहे.
पावसाची दडी! कोयनेतील आवक बंद; धरण भरण्यासाठी २१ टीएमसीची गरज
By नितीन काळेल | Published: August 18, 2023 12:40 PM