सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक नोंद नवजाला २५ मिलीमीटरची झाली. त्याचबरोबर नवजाच्या पावसाने यंदा साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला. तर कोयना धरण पाणीसाठ्याने चार दिवसानंतर ८३ टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे.पश्चिम भागातील ४० दिवसांच्या चांगल्या हजेरीनंतर पावसाने उघडझाप सुरू केली आहे. यामुळे चिंता वाढू लागली आहे. कारण, हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजूनही १० दिवस पावसाची दडी राहणार आहे. परिणामी धरणातील पाणीसाठा वेगाने वाढणार नाही. त्यातच पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या सर्व सहा धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही जवळपास १४८ टीएमसी आहे. सध्या यामधील काही धरणक्षेत्रात पावसाची दडी आहे. तर कोयना क्षेत्रातच उघडझाप आहे. त्यामुळे कोयनेत सावकाशपणे आवक होत आहे. त्यामुळे पाणीसाठा वेगाने वाढत नाही. इतर धरणांचीही अशीच स्थिती आहे.शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १९ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २५ आणि महाबळेश्वरला २३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. एक जूनपासूनचा विचार करता नवजाच्या पावसाने साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला आहे. आतापर्यंत तेथे ४५०४ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनेला ३१६७ आणि महाबळेश्वर येथे ४१९२ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात २५८६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा ८३.०६ टीएमसी झालेला. मागील चार दिवसांपासून कोयनेतून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.
Satara: नवजामध्ये पावसाचा साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पा पार
By नितीन काळेल | Published: August 11, 2023 12:52 PM