लोकमत न्यूज नेटवर्क, फलटण : निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच फलटणमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि संपूर्ण राजे गट हे दि. १४ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादांची साथ सोडत खासदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत हाती तुतारी घेणार आहेत. तर आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार करणार नाहीत.
गेले अनेक दिवस आमदार रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण हे खासदार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. महायुतीत असतानासुद्धा भाजपच्या नेतेमंडळींकडून होत असलेली अडवणूक व कार्यकर्त्यांना मिळत नसलेला सन्मान यामुळे पक्ष बदल करण्याचा दबाव कार्यकर्त्यांकडून नेतेमंडळीवर होता. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना रामराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घालून न्याय देण्याची मागणीसुद्धा केली होती. मात्र, दुर्लक्ष होत असल्याने रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक होऊन त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण व विद्यमान जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि राजे गटाचे सर्व कार्यकर्ते यांनी दि. १४ रोजी खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण मनाने कार्यकर्त्यांच्या बरोबर आपण आहोत. संजीवराजेंच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे. सध्या तरी आपण महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट करताना शांत राहण्याची भूमिका जाहीर केली.रामराजेंचा प्रवेश का नाही?
रामराजे हे सध्या विधानपरिषदेचे आमदार असून आणखी काही वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे रामराजे हे दि. १४ रोजी प्रवेश करणार नाहीत. यापेक्षा वेगळे कारणसुद्धा रामराजे यांच्या मनात असू शकते.