प्रमोद सुकरेकऱ्हाड : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालातून समोर आला आहे. भाजपचे आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यातील अंतर्गत वाद या निवडणुकीत चव्हाट्यावर आला. त्यांनी कारखाना निवडणुकीत सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात स्वतंत्र २ पॅनल उभी केली. साहजिकच त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला किंवा त्यांनी उचलला. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचे पॅनल या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तरमध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाले. भाजपचे मनोज घोरपडे यांनी 'कमळ' फुलवले. यामुळे मतदारसंघात वेगळाच माहोल होता. सह्याद्री कारखान्याची पहिलीच निवडणूक अन् कार्यक्षेत्रातील सुमारे ७५ टक्के मतदार याच कराड उत्तरमधील असल्याने परिवर्तन करण्याचा चंग विरोधकांनी बांधला होता.
सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विरोधक एकच तगडे पॅनल उभे करतील, अशी व्यूहरचना होताना दिसत होती. पण, त्याला दृष्ट लागली. शेवटच्या क्षणी जागा वाटपावरून मतभेद झाले. विरोधकांच्यात फूट पडून तिरंगी लढतीचे चित्र समोर आले. अगदी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुन्हा ही लढाई एकास एक व्हावी म्हणून प्रयत्न झाले खरे, पण त्यात विरोधकांना यश आले नाही.
वास्तविक जेव्हा विरोधकांच्यात फूट पडून त्यांचीच दोन पॅनल रिंगणात उतरली. तेव्हाच त्यांचे कार्यकर्ते मनात हरलेले दिसले. आता या तिरंगी लढतीचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होणार असे ते खासगीत बोलू लागले आणि मनात हरलेले सैनिक रणांगणात जिंकू शकत नाही, त्याचे प्रत्यंतर रविवारी निकालातून दिसून आले.
तिरंगी लढतीची तीच चूकआजवर कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात जेव्हा जेव्हा तिरंगी लढत झाली. तेव्हा त्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांनाच झाल्याचा इतिहास आहे. पण, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकास एक लढत झाली. अन् उत्तरेत परिवर्तन झाले. खरंतर हा अनुभव ताजा असतानाच पुन्हा विरोधकांनी तिरंगी लढतीची चूक केली. त्याचा फायदा पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांनाच झाला, हे समोर आले आहे.
विमानाचे ‘उड्डाण’ झालेच नाहीया निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांनी तिसरे पॅनेल रिंगणात उतरवले. जाहीर सभा अन् प्रत्यक्ष मतदार भेटीगाठीसाठी त्यांनी धडाका लावला. पण, त्यांना प्रत्यक्ष मिळालेली अत्यल्प मते पाहता त्यांच्या विमानाने या निवडणुकीत ‘उड्डाण’च केलेच नाही असे म्हटले जात आहे.
म्हणे, बाळासाहेब शत्रू पण परस्परांवरच टीकाया निवडणुकीत विरोधकांचीच दोन पॅनल रिंगणात उतरली. त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये बोलताना आमचा मुख्य शत्रू सत्ताधारी बाळासाहेब पाटील असल्याचे सांगितले. पण, प्रत्यक्ष प्रचार सभा, बैठकांमध्ये परस्परांवरच टीका केली. त्यांच्यातील टोकाचा संघर्ष चव्हाट्यावर आला. साहजिकच काठावरच्या मतदारांनी ‘कपबशी’'तूनच चहा पिणे पसंत केले.
‘मनो-धैर्य’ विस्कटले, गणित फिस्कटले!कऱ्हाड उत्तरमधून भाजपच्या माध्यमातून आमदारकीसाठी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे दोघेही इच्छुक होते. घोरपडेंना उमेदवारी मिळाली. सगळे एकवटले अन् परिवर्तन झाले. पण, 'सह्याद्री'च्या या निवडणुकीत 'मनो-धैर्य' विस्कटलेले दिसले अन गणित फिस्कटले. 'आता म्हणा ''रामकृष्ण'' हरी, पुन्हा बसले तेच सत्तेवरी!' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तिरंगी लढत झाली की घडविली?सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात तिरंगी लढत झाली, हे खरे आहे. पण, ही तिरंगी लढत नक्की अंतर्गत वादामुळे घडली की कोणी घडवून आणली, याबाबत कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
..पण ‘छत्री’ उघडलीच नाहीया निवडणुकीत सभासद परिवर्तनाच्या बाजूने मतांचा पाऊस पाडतील, असे सुरुवातीला बोलले जात होते. निवडणुकीदरम्यान वळवाच्या पावसाचे संकटही आले. पण, सभासदांनी 'छत्री' उघडीच नाही. त्यांनी जुन्याच आडोशाला जाणे पसंत केले.