अक्षय सोनटक्केपरळी: सातारा शहराच्या पश्चिमेस अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले सज्जनगडाची दुरवस्था झाली आहे. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर किल्ले सज्जनगडाच्या स्वच्छतेसाठी शेकडो तरुण पुढे सरसावले आहेत. परळी खोऱ्यातील ‘सज्जनगड संवर्धन टीम’ने हा अनोखा उपक्रम राबविला आहे.यावेळी सज्जनगडाचे तटबंदी, बुरूज, पायरी मार्ग तसेच बुरजावरील स्वच्छता करण्यात आली. दरवर्षी ही सज्जनगडावरील दिवाळीपूर्व स्वच्छता मोहीम शेकडो युवक एकत्र येत फत्ते करत असल्याने या मोहिमेचे कौतुक होत आहे.दिवाळी म्हटले की फटाक्यांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाई ठरलेली असते. सजलेली घरे असेच काहीचे समीकरण पाहायला मिळते. याच काळात सर्व जण आपल्या घरांची स्वच्छता करतात. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाची, इतिहासाची साक्ष म्हणून हे गडकिल्ले आपल्या जगण्याचाच एक भाग आहेत. दिवाळीमध्ये घराची साफसफाई केली जाते त्याचपद्धतीने परळी खोऱ्यातील किल्ले सज्जनगड संवर्धन टीमकडून सज्जनगड येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.या मोहिमेत परळी खोऱ्यातील शेकडो युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. किल्ले सज्जनगड संवर्धन टीमकडून सातत्याने सज्जनगडावरील स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवून इतिहासाची साक्ष देणारा सज्जनगड हा पुढच्या पिढीसाठी जसा आहे तसाच दिसण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते नक्कीच आदर्शवत असल्याचे स्थानिकांकडून म्हटले जात आहे.
किल्ले सज्जनगडाच्या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो तरुण, संवर्धन पथकाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 4:20 PM