पेट्री (सातारा) : कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम ३ सप्टेंबर रविवारपासून सुरू होत असल्याने देश-विदेशांतील पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कासच्या पुष्पपठारावर रंगीबेरंगी फुलांचे आगमन होण्यास सुरुवात झाली असून, रविवार, ३ सप्टेंबरपासून हंगामाची अधिकृत सुरुवात होत आहे. वाहन पार्किंग शुल्क व बस शुल्क कपात करून प्रतिव्यक्ती दीडशे रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.कास पठारावर सद्य:स्थितीत गेंद, कीटकभक्षी, सितेची आसवे, आमरी, तेरडा, सोनकी, टुथब्रश, रानहळद, नीलिमा, अबोलिमा, दीपकांडी, कंदीलपुष्प, ड्रॉसेरा, पद, अभाळी, नभाळी फुलांच्या जाती तुरळक दिसत असून, फुले फुलण्यास पोषक वातावरण असल्याने येत्या काही दिवसांतच पठार पूर्णपणे आच्छादित होण्यास सुरुवात होण्याचे चित्र आहे. आणखी बहुतांशी फुलांच्या जाती फुलल्या असून, धुके, पावसामुळे दिसत नाहीत. त्या उन्हाची चांगली ताप पडल्यावर पाहायला मिळतात. सध्या तुरळक पांढऱ्या, जांभळ्या रंगाची छटा पर्यटकांना दिसण्यास सुरुवात झाली आहे.पठार परिसरात गवताच्या जाती धरून विविधरंगी दुर्मीळ फुलांच्या ४३० च्या आसपास जाती असून, साधारण १३२ च्या आसपास पठारावर फुलांच्या जाती पाहावयास मिळतात. दरम्यान, फुलांचे नुकसान टाळण्यासाठी नियंत्रित पर्यटनासाठी ऑनलाइन बुकिंग www.kas.ind.in साइटवर रविवारपासूनच उपलब्ध होणार आहे.
Satara: जागतिक वारसास्थळ कास पठारावर रविवारी फुलांची पहाट
By दीपक शिंदे | Published: August 31, 2023 12:21 PM