सातारा : मलठण (ता. फलटण) येथील नागेश्वरनगरात आत्महत्या केलेली ऋतुजा सुशांत रासकर (वय २२) ही तरुणी पोलिस नसल्याचे तपासात समोर आले आहे. तिने खाकी वर्दीवर अनेक फोटो काढले असून, ती नातेवाइकांना मुंबई पोलिस असल्याचे सांगत होती. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.ऋतुजा रासकर हिने शनिवारी दुपारी नागेश्वरनगरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ती मुंबई पोलिस दलात कार्यरत असल्याचे समोर आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. ऋतुजा रासकर ही नातेवाइकांना आणि गावातील लोकांना मुंबई पोलिस दलात नोकरी करतेय, असे सांगत होती. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर खाकी वर्दीवरचे फोटो अपलोड करून ती नेहमी प्रकाशझोतात असायची. तिच्या फाॅलाेअर्सची संख्या ५० हजारांच्या आसपास आहे. मुंबई पोलिसांच्या पीसीआर दुचाकीवर बसून तिने फोटो व्हायरल केले होते, तर काही फोटो कोरोनाकाळात एका महिलेला मदत करतानाचे दिसून येत आहेत. या साऱ्या फोटोवरून ती मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे, असेच सगळ्यांना वाटत होते; परंतु फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून ऋतुजा ही पोलिस नसल्याचे समोर आणले. प्रश्न उपस्थित झाला तो तिने अशाप्रकारची खोटी माहिती सगळ्यांना का दिली. तर, या प्रश्नाचे उत्तरही पोलिसांनी शोधून काढले.सहानुभूती मिळविण्यासाठीचऋतुजाने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे तिच्या घरातले लोक नाराज झाले होते. या लोकांची नाराजी दूर करण्यासाठी व सहानुभूती मिळविण्यासाठी तिने मुंबई पोलिस दलात नोकरी करत असल्याचे म्हणे खोटे सांगितले. ती पोलिस नाही हे तिच्या पतीला माहीत होते. तिने आत्महत्या केल्यानंतर घरात पोलिसाचा बक्कल नंबर आढळून आला. या नंबरवरून पोलिसांनी माहिती घेतली असता तो नंबरही दुसऱ्या एका पोलिसाचा असल्याचे समोर आले.
Satara News: आत्महत्या केलेल्या 'त्या' तरुणीबाबत धक्कादायक माहिती आली समोर, खाकी वर्दीच्या फोटोमुळे गूढ वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:33 AM