संजय पाटीलकऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. उंडाळकर गटाशी एकी झाल्याने पृथ्वीबाबांचे हात बळकट झालेत. मात्र, डॉ. अतुल भोसले यांनीही ताकद पणाला लावली आहे. ‘अभी नहीं, तो कभी नहीं’ अशी परिस्थिती असल्याने येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.कऱ्हाड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात १ हजार ८०० कोटींचा निधी मतदार संघांसाठी दिला. त्यानंतर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असतानाही त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून येथे निधी आणला आहे तर कोणतेच पद नसतानाही डॉ. अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपश्रेष्ठींचा विश्वास जिंकत दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक प्रचंड चुरशीची होणार, हे निश्चित आहे.
सामान्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान!ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची रयत आघाडी यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असून ही जमेची बाजू आहे. मात्र, वाडीवस्तीतील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सध्या त्यांच्यासमोर आहे.
कऱ्हाड, मलकापूरची साथ गरजेची !डॉ. अतुल भोसले विकासनिधीच्या माध्यमातून गावोगावी पोहोचलेत. मात्र, कऱ्हाड आणि मलकापूर शहरांतील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना शहरांवर लक्ष द्यावे लागणार आहे.
२०१४ पासून ‘हाय व्होल्टेज’ निवडणूककऱ्हाड दक्षिण मतदार संघात २०१४ च्या निवडणुकीपासून ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळतोय. गत दोनवेळच्या विधानसभा निवडणूका तिरंगी झाल्यामुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
कऱ्हाड दक्षिण विधानसभा २०१९ ची निवडणूक
- पृथ्वीराज चव्हाण : ९२२९६
- डॉ. अतुल भोसले : ८३१६६
मतदार
- पुरुष : १५८८३७
- महिला : १५३८८८
- तृतीयपंथी : ३२
- एकूण : ३१२७५७