सातारा - वाई तालुक्यातील केंजळ येथील युवकांनी शुक्रवारी रात्री महापुरुषाचा पुतळा केंजळ ग्रामपंचायतीच्या आवारात बसवला. हा पुतळा बसविण्यासाठी येथील युवकांनी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे येथे प्रशासनातर्फे पोलीस उपअधीक्षक गणेश केंद्रे, तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी केंजळ गावाला भेट दिली. प्रशासनाने पुतळा काढण्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळा बसवावा. तोपर्यंत पुतळा हटविण्यावर प्रशासन ठाम असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले, तर पुतळा हटविण्यास युवकांचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांना सांगितले. हा पुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवणार नसल्याचे येथील युवावर्ग व ग्रामस्थांनी प्रशासनास सांगितले. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.
ग्रामस्थांनी संबंधित पुतळा हटवण्यासाठी केलेल्या विरोधामुळे येथे दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात यावेळी वादावादी झाली. याचे गांभीर्य ओळखून केंजळ गावात पोलिसांची अधिकची कुमक व दंगा नियंत्रण पथक तैनात केले. सायंकाळपर्यंत याबाबत तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ व प्रशासन अधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू असून यातून मार्ग निघेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.