सातारा : शहरी व ग्रामीण भागात वृक्षतोडीच्या घटना आजही सर्रासपणे सुरू आहेत; परंतु सातारा शहर याला अपवाद ठरू लागले आहे. पर्यावरणाच्या बाबतीत नागरिकांमध्ये जशी सजगता निर्माण झाली आहे तशीच सजगता पालिका प्रशासनाने दाखविल्याने शहरातील अंतर्गत रस्ते आता हिरव्यागार वृक्षराजीने बहरू लागले आहेत.अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या सातारा शहरात पूर्वी वृक्षांची संख्या मोठी होती; मात्र जसजसा शहराचा विस्तार व विकास होत गेला तशी शहरातील वृक्षांची संख्या कमी होत गेली; मात्र हळूहळू सातारा यातून सावरू लागला. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. फलस्वरूप उन्हाळ्यात बोडका दिसणारा अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर डोंगर, पेढ्याचा भैरोबा अशी महत्त्वाची ठिकाणं वृक्षांनी बहरुन गेली.सातारकरांना देताहेत हक्काची सावलीसातारा पालिकेच्या वतीने शाहू चौक ते राजपथ या मार्गावर पाच वर्षांपूर्वी वृक्षांची लागवड करण्यात आली. हे वृक्ष कितपत तग धरून उभे राहतील असे प्रश्नही त्यावेळी उपस्थित करण्यात आले; मात्र प्रशासनाने या वृक्षांचे संगोपन केल्याने आज ते डामडौलात उभे राहिले आहेत. हे वृक्ष राजपथाची केवळ शोभा वाढवत नाहीत तर उन्हाळ्यात हक्काची सावली देण्याचे कामही करत आहेत.या परिसराचे सौंदर्य खुललेशाहू चौक ते वाहतूक शाखा, पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय ते बॉम्बे रेस्टॉरंट, वायसी कॉलेज परिसर, तहसील कार्यालय ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक अशा विविध ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या वृक्षांमुळे सातारा शहर आज हिरव्यागार वृक्षराजीने बहरून गेले आहे.
सातारा शहरातील रस्त्यांना हिरवाईचा साज!, वृक्षांचे होतेय संवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:16 PM