सातारा : पहिल्या बेंचवर बसून एमपीएससीची परीक्षा देत असताना विद्यार्थ्याने स्वतःजवळ कीपॅड आणि राउटर ठेवला. मात्र वर्गातील पर्यवेक्षकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने चक्क वर्गातून धूम ठोकली. हा खळबळजनक प्रकार वरये, ता. सातारा येथील एका महाविद्यालयामध्ये काल, रविवारी दुपारी घडला.याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहराजवळील वरये येथे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयांमध्ये काल, रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली परीक्षा पार पडली. यावेळी या उपकेंद्रांतील खोली क्रमांक पाचमध्ये तिसऱ्या रांगेतील पहिल्या बेंचवर अजित भुजंगराव शिंदे (रा. स्वरूप कॉलनी, सदर बझार सातारा) हा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी बसला होता. परीक्षा सुरू होऊन तासभर झाला होता. नंतर त्याच्या हालचाली संशयास्पद सुरू झाल्या.
त्याच्या पँटमध्ये त्याने काही तरी लपवले असल्याचे वर्गातील पर्यवेक्षक विश्रांती जाधव यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी त्याला याबाबत विचारले असता तो गोंधळून गेला. क्षणात तो जागेवरून उठला आणि वर्गातून बाहेर पळू लागला. याचवेळी त्याच्याजवळ असलेल्या काही वस्तू खाली पडल्या. त्यात लाल रंगाचा मिनी कीपॅड असलेला मोबाईल आणि राउटर होता. इलेक्ट्रिक साधनांचा वापर करून अवैध मार्गाने परीक्षा पास होण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले.
मात्र तत्पूर्वीच हा त्याचा डाव वर्गातील पर्यवेक्षकांनी हाणून पाडला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात अजित शिंदे या परीक्षार्थीवर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक पाटील हे अधिक तपास करत आहेत.