सातारा : जिल्हा मार्च महिन्यातच तापाला असून सातारा शहराचा पारा तर ३९ अंशाच्या उंबरठ्यावर पोहाेचला आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास रखरखीत ऊन पडत असून चटकाही जाणवत आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे हे दोन महिने तापदायक ठरणार अशीच चिन्हे आहेत.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. तसेच थंडीही कमी राहिली. हिवाळ्यात ११ अंशाच्या खाली तापमान घसरले नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता आला नाही. त्यातच थंडी कमी राहण्याने फेब्रुवारीच्या मध्यापासूनच पारा वाढत चालला होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागलेली. मार्च महिना सुरू झाल्यानंतर मात्र, रखरखते ऊन पडू लागले. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असणार असा अंदाज होता. सध्याची स्थिती पाहता उन्हाळा सर्वांनाच तापदायक ठरणार हे स्पष्ट झालेले आहे.मार्च महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्याचे कमाल तापमान वाढू लागले. त्यामुळे सकाळी नऊनंतर ऊन वाढत जात आहे. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत उन्हाचा कडाका असतो. सातारा शहराचा पारा तर रविवारी यावर्षी प्रथमच ३८ अंशावर पोहोचला. तर पूर्व माण, खटाव, फलटण या दुष्काळी भागातील तापमान ३९ अंशावर जाऊ लागले आहे. यामुळे शेतीची कामे करणारे शेतकरी आणि मजुरांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. तरीही सध्या रब्बी हंगामातील पीक काढणी आणि मळणी वेगाने सुरू असल्याने कडाक्याच्या उन्हातही काम करण्याची वेळ सर्वांवरच आलेली आहे. तर सातारा शहरात दुपारी १२ नंतर रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झालेली आहे. नागरिकही खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. सायंकाळी सहानंतरच बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात अनेकवेळा पारा ३९ ते ४२ अंशादरम्यान राहतो. पण, यंदा मार्च महिन्यातच तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यात सातारा शहराबरोबरच जिल्हा पारा अनेकवेळा ४० अंशावर जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सातारा शहराचे कमाल तापमान असे..दि. १० मार्च ३७.२, ११ मार्च ३६.९, १२ मार्च ३७.७, १३ मार्च ३७, १४ मार्च ३६.८, दि. १५ मार्च ३६.२, १६ मार्च ३५.४, १७ मार्च ३६.६, १८ मार्च ३५.५, १९ मार्च ३६, २० मार्च ३५.८, दि. २१ मार्च ३६, २२ मार्च ३७, २३ मार्च ३७.२, दि. २४ मार्च ३८.५