शेखर जाधववडूज : वडूजमधील साडेदहा एकरातील तालुका क्रीडा संकुल खेळाविना पंचवीस वर्षांपासून पडून आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे संकुलाच्या चौफेर अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना काही वर्षांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांनाही अतिक्रमणधारकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.वडूजमध्ये १९९६ मध्ये राज्यातील पहिले क्रीडा संकुल म्हणून मान्यता मिळाली. तालुक्यातील क्रीडाप्रेमींच्या आनंदोत्सव साजरा झाला. तालुक्याच्या ठिकाणी एक क्रीडा संकुल या धर्तीवर संकुल उभारले. जागाही आरक्षित केलेली आहे. आजअखेर धावपटी, बॅडमिंटन कोर्ट सुसज्ज आहे. संरक्षण भिंतीसाठी निधी ही मंजूर आहे. अतिक्रमण फोफावल्यामुळे अनेक खेळाडूंना मैदानाअभावी खेळाचा सराव करणे कठीण बनले आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडील जागा १५ जानेवारी १९९० च्या अध्यादेशानुसार वडूज ग्रामपंचायतीकडे क्रीडांगणसाठी भाडेतत्त्वावर प्रदान केली. वडूज मिळकत नंबर ३८४/१ अ/ १/२ हे हेक्टर क्षेत्र ४ आर मध्ये हे तालुकास्तरीय क्रीडा संकुल आहे. ६७ लाख रुपये खर्चून जिमनॅस्टिक हाॅल व तालुका क्रीडा कार्यालय बांधले; परंतु त्या ठिकाणी वास्तव्य व देखरेख नसल्याने इमारतीचे नुकसान झाले आहे.हुतात्म्यांच्या भूमीतील तालुका क्रीडा संकुलाच्या आरक्षित जागेवर असलेल्या अतिक्रमणधारकांना यापूर्वी तहसीलदारांकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या महत्त्वपूर्ण विषयाबाबत तालुक्यातील बोटावर मोजण्याइतकेच क्रीडाशिक्षकांची धडपड निश्चितच वाखणण्याजोगी असली तरी त्यांनासुध्दा काहीवेळा मर्यादा पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तहसीलदारांनी ठोस पावले उचलावीत या ठिकाणी अतिक्रमण करणारे मजूर दिसत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. वास्तविक पाहता याबाबत क्रीडा संकुल समितीचे सचिव या नात्याने तहसीलदारांनी कठोर व ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.
यासंदर्भात तालुका क्रीडा अधिकारी, समिती सदस्य व निमंत्रित सदस्य यांची व्यापक बैठक झाली होती. त्यावेळी प्राधान्याने या गंभीरविषयी सखोलपणे चर्चाही झाली होती. यासंदर्भात पुन्हा तातडीने बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. - किरण जमदाडे, तहसीलदार, खटाव