सातारा : कोल्हापूरकडून पाटणच्या दिशेने निघालेल्या चालत्या कारला अचानक आग लागल्याने मलकापुरात महामार्गावर द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. येथील शिंदे होंडा शोरूमसमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत कार जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चालकांसह नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे तिघांचे जीव वाचल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज पाटील (रा. पाटण) हे कार (एमएच ०४ बीएस ६९८२) मधून पती, पत्नी व मुलगी असे तिघे कामानिमित्त कोल्हापूरकडे गेले होते. काम आटोपून ते परत पाटणकडे निघाले होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाच वाजण्याच्या सुमारास मलकापूर, ता. कऱ्हाड येथील शिंदे होंडा शोरूमसमोर आले असता कारच्या बॉनेटमधून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या स्थितीतच कार महामार्गाकडेला थांबवली. तोपर्यंत कारच्या पुढील भागातून धुराचे लोट बाहेर पडत होते.
कार पेटल्याची माहिती झपाट्याने परिसरातील नागरिकांना समजली. जवळच असलेल्या डीपी जैनचे दस्तगीर आगा, संभाजी घुटुगडे, दिलीप कुमार, नीलेश, अनिल कांबळे, संभाजी लाखे, नीलेश औंधकर, शंकर लाखे, गणेश खोत यांच्यासह व्यावसायिक व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. डीपी जैनचे मिक्सर गाडीतील पाण्याच्या फवारा मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही. कारने जास्तच पेट घेतला. तत्काळ कऱ्हाड पालिकेच्या अग्निशामक दलाला बोलून घेण्यात आले. त्यानंतर आग विझविण्यात आली. मात्र काही मिनिटांतच कार जळून खाक झाली. मात्र, कारमधील सर्व सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. तोपर्यंत कार जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.