कऱ्हाड : येथील विमानतळावरविमान चालविण्याचे प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षणार्थी पायलटचे नियंत्रण सुटल्यामुळे विमान काही फूट अंतरावरुन जमिनीवर कोसळले. त्यामध्ये पायलट जखमी झाला. गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या ‘सोलो ट्रेनिंग’ सुरु असताना ही दुर्घटना घडली.कऱ्हाडच्या विमानतळावर मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या अॅम्बिसिअन्स फ्लाईग क्लबने आठ महिन्यांपूर्वी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. याठिकाणी वीस प्रशिक्षणार्थींची पहिली बॅच प्रशिक्षण घेत आहे. सध्या ‘सोलो ट्रेनिंग’ (प्रशिक्षणार्थीने एकट्याने विमान चालविणे) सुरू आहे. गुरूवारी सकाळी एक प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण घेत होता. धावपट्टीवरुन हे फोर सीटर विमान धावत असताना त्याची पॉवर वाढली आणि विमान हवेत उडाले. त्यानंतर काही क्षणातच ते धावपट्टीवर दक्षिण बाजुच्या संरक्षक भिंतीजवळ कोसळले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींसह अधिकारी व सुरक्षारक्षकांनी त्याठिकाणी धाव घेत प्रशिक्षणार्थीला अपघातग्रस्त विमानातून बाहेर काढले.विमानतळाच्या दक्षिणेकडील संरक्षक भिंत ही वारुंजी गावालगत आहे. तेथून अगदी थोड्या अंतरावरच विमानाचा हा अपघात झाला. अपघातापूर्वी विमान हवेत हेलकावे खात असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर थोड्याच वेळात विमान भिंतीच्या आतील बाजूला कोसळल्याचे वारूंजीतील ग्रामस्थांनी सांगितले.
Satara: प्रशिक्षणार्थी पायलटचे नियंत्रण सुटल्याने विमान कोसळले, कऱ्हाडात घडली दुर्घटना
By संजय पाटील | Published: April 18, 2024 5:12 PM