मलकापूर : भरधाव ट्रकचा टायर फुटून उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर आदळला. यामध्ये ट्रॉली पलटी झाली. हा अपघात पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर वारुंजी फाटा येथील उड्डाणपुलावर आज, शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. ट्रकच्या धडकेने ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पसरल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात उसासह ट्रॉली व ट्रकचे मोठे नुकसान झाले.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ऊसवाहतूक करणारा चालक ट्रॅक्टरसह उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन कऱ्हाडच्या दिशेने निघाला होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर वारुंजी फाट्यावरील उड्डाणपुलावर आला असता कऱ्हाडकडे निघालेल्या कंटेनर (एनएल १ एई ६८२०)चा अचानक टायर फुटला.यामुळे ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या धडकेमुळे ट्रॉलीतील ऊस मोठ्या प्रमाणावर महामार्गावर पसरला होता. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली. प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर चालकाने ऊस बाजूला ओढून एक लेनवरील वाहतूक सुरळीत केली.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभालचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, प्रकाश गायकवाड, सलीम देसाई, अमित पवार यांच्यासह महामार्ग पोलीस कर्मचारी व कऱ्हाड शहरचे प्रशांत जाधव अपघातस्थळी दाखल झाले. ऊस वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेला ऊस बाजूला केला. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
भरधाव ट्रकचा टायर फुटल्याने उसाच्या ट्रॉलीला धडक, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 4:12 PM