वडूज : ‘भारत जोडो यात्रेतून एकत्र येऊन लढूयात, आपल्याला देश जोडायचा आहे, तोडायचा नाही. देशाला वाचविणे हे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी भारत जोडो यात्रेचे समर्थन करू या. सर्वसामान्य जनतेला भारत जोडण्याची हाक देणारी ही यात्रा आहे. या यात्रेद्वारे उतरून एकत्र लढूयात. मतांच्या राजकारणासाठी धार्मिक विभाजनाचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे,’ अशी टीका ज्येष्ठ विचारवंत ललित बाबर यांनी केली.वडूज येथील बसस्थानक परिसरातून सुरू झालेली जनसंवाद यात्रा हुतात्मा चौकातून बाजार पटांगणावर आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा समन्वयक रणजितसिंह देशमुख, सत्यवान कमाने, महेश गुरव, शशीकला देशमुख, वंदना शिंदे, डॉ. नारायण बनसोडे, ॲड. प्रल्हाद सावंत उपस्थित होते.ललित बाबर म्हणाले, ‘देशात बेरोजगारी, महागाई यांची चर्चाच होत नाही. ९७ टक्के लोकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. इंग्रजांची नीती अवलंबून दिल्ली व महाराष्ट्रात हुकूमशाहीचे राज्य सुरू आहे. देशाला तोडायची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी कितीही वेळा तोडण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला तो जोडायचे आहे. जनतेने एकत्रपणे रस्त्यावर उतरून एकजूट दाखवावी.’रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘हा तालुका क्रांतिकारकांचा असून येथील सर्वसामान्य जनता आता एकवटलेली आहे. कष्टकरी, शेतकरी, ललित व सोशिक जनतेला देशोधडीला लावण्याचे पाप भाजप करीत आहे. संविधान वाचवण्यासाठी आपण एकत्रित लढा उभारण्याची गरज आहे. ‘भारत जोडो’ यात्रा ही सर्व घटकांसह तळागाळातील विखुरलेल्या जनतेसाठी आहे. मनुवादी सरकारला धडा शिकविण्यासाठी या यात्रेत सहभागी होऊयात.’यावेळी ‘नफरत छोडो, भारत जोडो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी बहुजन क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, वंदना शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. हणमंत खुडे यांनी सूत्रसंचालन केले. महेश गुरव यांनी आभार मानले. याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, सुनील नेटके, राहुल सजगणे, प्रभा यादव, किरण कांबळे, इम्रान बागवान, शबाना शेख, महेश भोई, आनंदा साठे उपस्थित होते.सध्या देशात दोनच पक्ष....या देशात सध्या फक्त दोनच पक्ष उरले असून यामध्ये देश तोडणारा भाजप व देश जोडणारा काँग्रेस. काँग्रेससोबत असलेले सर्व पक्ष असल्याचेही ललित बाबर यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले
सत्ताधाऱ्यांकडून मतांच्या राजकारणासाठी धार्मिक विभाजनाचे काम, ज्येष्ठ विचारवंत ललित बाबरांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 7:13 PM