सातारा : भुईंज येथील कृष्णा नदीच्या पात्रातील खडकावर खून करून फेकून देण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. विजय चिमासाहेब मोहिते (वय ७२, रा, कुडाळ तर्फे बामणोली, ता. जावळी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुईंज येथील कृष्णा नदीच्या पात्रातील खडकावर अनोखळी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर गळा दाबून खून झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. त्यामुळे पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी भुईंज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचा तपास सुरु होता. अखेर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली.मोहिते हे गावातील एक लग्न असल्याने पाचवड आले होते. त्यांना दारूचे व्यसन होते. घटनेदिवशी त्यांनी अतिमद्य प्राशन केले होते. असे असताना त्यांचा मृतदेह कृष्णा नदीच्या पात्रातील खडकावर आढळून आला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर कोणतेही संशयास्पद पुरावे समोर आले नाहीत. घरातल्या लोकांनीही त्यांचा कोणावर संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले, तर दुसरीकडे डॉक्टरांनी खुनाचा संशय व्यक्त केल्याने पोलीस संभ्रमात पडले.नेमका हा खून आहे की, अति मद्य प्राशन करून त्यांचा मृत्यू झाला आहे, हे अद्याप पुढे आले नाही. पुढील तपासणी पोलिसांनी मोहिते यांच्या मृतदेहाचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयातील तज़्ज्ञ डाॅक्टरांच्या समितीकडे दिला आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच हा खून होता की नैसर्गिक मृत्यू, हे समोर येणार आहे. भुईंज पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत.
भुईंज येथे खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली, मृत बामणोलीचा; खूनाचे कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 4:56 PM