कऱ्हाड : पावसाची उघडीप आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे कोयना नदीचीपाणीपातळी सध्या खालावल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी नदीपात्र पूर्णपणे कोरडे पडले असून, भविष्यात तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागण्याची चिन्हे आहेत.कऱ्हाडसह पाटण तालुक्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला. पावसाने ओढ दिल्यामुळे कोयना धरणही पूर्ण क्षमतेने भरले नाही. धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, प्रत्यक्षात धरण सुमारे ९५ टीएमसी भरले होते. त्यानंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा देखील खालावला. काही दिवसांपूर्वी पूर्वेकडे सिंचनासाठी मागणी झाल्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातील जनित्र सुरू करुन प्रति सेकंद २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, आता तो विसर्गही बंद करण्यात आल्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. ज्याठिकाणी नदीपात्र रुंद आहे, त्याठिकाणी पात्र कोरडे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Satara: धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, कोयना नदीची पाणीपातळी खालावली
By दीपक शिंदे | Published: November 08, 2023 4:55 PM