कऱ्हाड : कऱ्हाडचे ग्रामदैवत असलेल्या कृष्णामाईची यात्रा काल, सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली. पंचक्रोशीसह राज्यभरातील हजारो भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावून कृष्णामाईचे दर्शन घेतले. यावेळी ‘कृष्णामाईच्या नावानं चांगभलं’चा गजर नदीतीरावर घुमला.प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कृष्णामाईची यात्रा कृष्णा-कोयना नदीकाठी उत्साहात पार पडली. सोमवारी यात्रेनिमित्त देवीच्या उत्सव मूर्तीवर हळदी-कुंकू वाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. सकाळी दुग्धाभिषेकाने देवीच्या मूर्तीस स्नान घालून तिची विधिवत पूजा करण्यात आली. पूजेनंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. हजारो भाविकांनी देवीची ओटी भरून दर्शन घेतले. ग्रामदैवत कृष्णामाई नवसाला पावते, अशी ख्याती असल्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.
यात्रेसाठी गावागावातून देव-देवतांच्या पालख्या सकाळीच कऱ्हाडात दाखल झाल्या. या पालख्या कृष्णा नदीकाठी नेऊन त्या ठिकाणी भाविकांनी आंघोळ केली. तसेच प्रसादात शेतातून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा अन् चटणी भाकरी खाल्ली. या पालख्यांपुढे हलगी, ढोलांचा दणदणाट करण्यात आला. त्या आवाजावर काही भाविकांनीही ठेका धरला.
खण, नारळाची ओटी
कृष्णामाईच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर महिला भाविकांकडून देवीचा खण, नारळाने ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी माहेरवाशीण महिला मोठ्या संख्येने कृष्णातीरी दाखल होतात. मंदिराबाहेर खण, नारळाच्या विक्रीसाठी अनेक विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते.
..अशी आहे कृष्णामाईची आख्यायिका!
चाफळचे बाजिपंत करकरे यांनी कोकणात बसविण्यासाठी पांढऱ्या पाषाणाची देवीची मूर्ती उत्तर हिंदुस्थानातून तयार करून आणली होती.मात्र, ही मूर्ती कृष्णाकाठी स्थापन करावी व अंताजी बहिरव आवटे यांच्या स्वाधीन करावी, असा दृष्टांत बाजीपंत करकरे यांच्या पत्नीला झाला.अखेर कऱ्हाडला कृष्णाकाठी झोपडीवजा जागेत देवीची स्थापना करण्यात आली. तसेच ती मूर्ती आवटे यांच्या स्वाधीन करण्यात आली.भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या पत्नी राजसबाई या विटे येथे राहत. त्यांच्याकडे कामासाठी आलेला गुजराथी ब्राह्मण निपुत्रिक मरण पावला.त्या ब्राह्मणाच्या बेवारशी तीन हजार रुपयांच्या मालमत्तेचा विनियोग कृष्णामाईचे हेमाडपंथी मंदिर बांधण्यासाठी करण्यात आला. १७०९ मध्ये या देवीची स्थापना झाली.