सातारा : उच्चशिक्षित मुलेही सायबर चोरट्यांच्या गळाला लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असून, साताऱ्यातील एका बीई मेकँनिकल इंजिनिअरला अनोळखी व्यक्तीशी मोबाइलवर चॅटिंग करणे महागात पडले आहे. हाॅटेल व इतर ठिकाणांना रेटिंग देण्याचे सांगून संबंधिताने तब्बल २ लाख ६५ हजारांना अभियंत्या तरुणाला गंडा घातला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यात राहणारा २८ वर्षीय तरुण बीई मेकँनिकल इंजिनिअर आहे. चार दिवसांपूर्वी त्याच्या टेलीग्रामवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये हाॅटेलला रेटिंग दिल्यास काही पैसे मिळतील, असे सांगितले. त्या अभियंत्या तरुणाने चॅटिंग करण्यास सुरुवात केली. अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर वेगवेगळे टास्क करायला सांगितले. तो जसे सांगत गेला.तसे अभियंता तरुण ऐकत गेला. १८० रुपये अभियंत्या तरुणाच्या अकाउंटमध्ये पाठवून अनोळखी व्यक्तीने त्याचा विश्वास संपादन केला. मात्र, रेटिंग देताना काही चुका झाल्या आहेत, तुम्हाला आणखी पैसे द्यावे लागतील, असे सांगून संबंधित व्यक्तीने दहा-पाच हजार नव्हे तर तब्बल दोन लाख ६५ हजार रुपये उकळले. तेव्हा संबंधित अभियंता खडबडून जागा झाला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला. आपली चूक लक्षात येताच त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांकडून तपास सुरूया फसवणूक प्रकरणाची सायबर पोलिसांनी दखल घेतली असून, संबंधित अभियंत्याच्या मोबाइलवरून नेमके कोणत्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले, याची माहिती सायबर पोलिस घेत आहेत. जेणेकरून सायबर चोरट्याच्या हाती पैसे लागू नयेत, यासाठी सायबर पोलिस प्रयत्नशील आहेत.
आपल्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीने पाठवलेली कोणतीही लिंक ओपन करू नका, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. उच्चशिक्षित मुले अशा लिंकवर तत्काळ विश्वास ठेवतात. अनेकदा अशा लिंक ओपन करू नका, असे सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. सगळ्यात सतर्कता महत्त्वाची आहे. -अरुण देवकर, पोलिस निरीक्षक, सातारा