औंध : औंध येथील एका बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील तांब्या पितळेची भांडी, साड्या, चांदीच्या वस्तू असा सुमारे ५१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घटनास्थळ व औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील ब्राह्मण गल्लीमध्ये नारायण व्यंकट देशमुख यांचे घर आहे. देशमुख कुटुंबातील सर्व सदस्य नोकरी, कामधंद्यानिमित्त परगावी राहत असल्याने त्यांचे घर हे बंद असते. मात्र, त्यांच्याशेजारी राहणाऱ्या महिलेने सातारा येथे राहणाऱ्या नारायण देशमुख यांना तुमच्या स्वयंपाक घराच्या दरवाजाच्या बिजागरी, कडी कोयंडे अज्ञात चोरट्यांनी तोडल्याचे सांगितले.
याबाबत देशमुख यांनी माहिती मिळताच स्वयंपाक घर व घरातील मागची खोली पाहिली असता. चोरट्यांनी कपाटातील साड्या तसेच तांबे, पितळेची भांडी, डबे, पातेली, स्टोव्ह, हंडा, बंब, ताटे, बादल्या, घमेली, फुलपात्रे, चरव्या, कळशी, चांदीचा करगोटा, टाक, पैंजण अशा वस्तू चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
सुमारे ५१ हजार रुपयांच्या या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.
त्यानंतर याबाबतची फिर्याद नारायण व्यंकट देशमुख यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
२०औंध चोरी
फोटो: औंध येथील बंद घरातील कपाट फोडून चोरट्यांनी चोरून नेलेल्या वस्तू व सर्व भांडी लंपास केल्याने घर मोकळे पडलेले आहे.
(छाया :रशिद शेख)