लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिले आहे. दरम्यान, या प्रकाराबाबात अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, एका साठ वर्षीय महिलेला त्रास होऊ लागल्याने शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्यासुमारास नातेवाईकांनी उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर त्या महिलेचा "ईसीजी'' काढण्यासाठी अन्य कक्षात हलविण्यात आले. त्यावेळी त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ होती. "ईसीजी'' काढल्यानंतर त्या महिलेची प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना त्या महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयातील सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह ताब्यात घेताना त्यांच्या गळ्यात सोन्याची माळ नसल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालयातील कर्मचारी व नातेवाईकांनी सोन्याच्या माळेची शोधाशोध सुरू केल्यानंतर अतिदक्षता विभागात माळेमधील काळे मणी तुटून पडल्याचे समोर आले. त्यामुळे अज्ञात चोरट्याने मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी या प्रकाराच्या चौकशीसाठी समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत.