म्हसवड : म्हसवड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ-जोगेश्वरी रथोत्सवात १९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व चार मोबाईल असा अंदाजे आठ लाख रुपयांच्या भाविकांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून पोलीस संशयितांचा शोध घेत असून, त्यांना अद्याप एकाही चोरट्याला शोधण्यात यश आले नाही.म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रेमध्ये बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने ११५ पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड व १५ अधिकारी तैनात केले होते. यात्रेदरम्यान गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेक चोरट्यांनी भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि इतर किमती ऐवजावर डल्ला मारला आहे.
रथोत्सवाच्या दिवशी भानुदास रघुनाथ काळेल (रा. पर्वती, पुणे) यांची १७ ग्रॉमची सोन्याची चेन, कुबेर तानाजी काळेल (रा. वळई) यांची २ तोळ्यांची चेन, आनंदा शंकर चव्हाण (रा. शहापूर, मसूर) यांची दीड तोळ्याची चेन, सुनील रामचंद्र पोरे (रा. कोरेगाव) यांची १ तोळ्याची चेन, आदित्य विजय पोरे (रा. कोरेगाव) यांची १ तोळ्याची चेन, दिनकर नामदेव माने (रा. तासगाव) यांची दीड तोळ्याची चेन, शुभम संभाजी पाटील (रा. मिरज) यांची दीड तोळ्याची चेन, प्रांजली दादासाहेब खाडे (रा. अकलूज, सोलापूर) यांचे १५ ग्रॅमचे मिनी गंठण व १ तोळ्याची चेन, स्वप्नील हरिश्चंद्र साळुंखे (रा. माळशिरस) यांची १ तोळ्याची चेन, राहुल कृष्णा ननावरे (रा. माळशिरस) यांची २ तोळ्यांची चेन, दत्तात्रय भीमराव देशमुख (रा. विखळे, खटाव) यांची १ तोळ्याची चेन, शोभा सूर्यकांत पवार यांची १ तोळ्याची चेन असे १९ तोळे सोन्याची दागिने, तसेच सागर भीमराव सोरटे (रा. विटा) अशोक भीमराव मखरे (रा. कऱ्हाड ), तुकाराम राजाराम पाटील व सागर भारत शिंदे (रा. खटाव) यांचे असे चाळीस हजारांचे चार मोबाईल चोरीस गेले आहेत.
याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटना घडून आठ दिवस झाल्यानंतरही पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. अद्याप एकालाही अटक करण्यात आली नाही.