सातारा : येथील सदर बझारमधील कोयना सोसायटीतील गॅरेजमध्ये झालेल्या चोरीचा छडा बारा तासांच्या आत लावण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.अनिल बापूराव मोहिते (वय २९), शुभम अजय जाधव (रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार सातारा) व एका अल्पवयीन मुलगा अशी ताब्यात घेतल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेंद्र सोमनाथ मंजुळे (वय ३८, रा. कोयना सोसायटी सदर बझार) यांचे घराशेजारीच गॅरेज आहे.
या गॅरेजमधून अज्ञात चोरट्याने लोखंडी पेटीमध्ये असलेले विविध साहित्य सुमारे २० हजार रुपये किमतीचे चोरून नेले होते. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुरूवातीला अनिल मोहिते याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने शुभम जाधव आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने गॅरेजमध्ये चोरी केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली आहे.या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, हवालदार धीरज कुंभार, अभय साबळे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, शिवाजी भिसे यांनी भाग घेतला.