नागठाणे : येथील ‘आपला बझार’ या किराणा मालाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ५३,५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नागठाणे परिसरातील नागठाणे-सासपडे रोडवरील चौंडेश्वरी मंगल कार्यालयासमोर, राजेंद्र फत्तेसिंह नाईक (रा. चिखली ता. शिराळा जि. सांगली) यांचे ‘आपला बझार’ नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. दुकानामध्ये बाबासाो. जयसिंग पाटील (वय ३६, मूळ रा. खानापूर ता. वाळवा जि. सांगली, सध्या रा. नागठाणे ता. सातारा) हे मॅनेजर म्हणून तर तुषार सावंत आणि तानाजी तळेकर हे कामगार आहेत. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे ८.३० च्या सुमारास बाबासाो. पाटील हे दुकान बंद करून रूमवर राहण्यासाठी गेले. दरम्यान, बुधवारी सकाळी ६.४० वाजेच्या सुमारास तुषार सावंत हे रस्त्याने फिरत दुकानाच्या बाजूने येत असताना त्यास दुकानाचे शटर अर्धवट उघडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने त्यांनी पाटील यांना खबर दिली. त्यावेळी त्या दोघांनी मालक राजेंद्र नाईक यांना फोन करून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्या दोघांनी दुसरे शटर उघडून दुकानातील पाहणी केली असता ५३,५०० रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली असल्याचे चित्र स्पष्ट झाले. दरम्यान, जयसिंग सुतार (रा. नागठाणे ता. सातारा) यांचे त्रिमूर्ती वॉच अँड गिफ्ट हाऊसचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची फिर्याद बाबासाो. पाटील यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सुरू आहे.