कऱ्हाड, दिः आगाशिव नगर (ता. कऱ्हाड) येथील बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे दीड लाखाचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरूवारी भरदिवसा घडली. याबाबतची फिर्याद अक्षय जगन्नाथ पाटील (वय २२, रा. हनुमान नगर, आगाशिव नगर, ता. कऱ्हाड) याने शहर पोलिसात दिली आहे. यामुळे आगाशिव नगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी पाटील हे आगाशिव नगरमधील वेदांतिका प्राईड्समध्ये वास्तव्याला आहेत. ते गुरूवारी सकाळी पत्नी व मुलाला घेऊन त्यांच्या सासरी विंग येथे गेले. त्यानंतर ते त्यांचे नातेवाईक मयत झाल्याने त्यांच्या कार्याला पाडळी येथे गेले. त्यानंतर राहिलेली कामे उरकून पुन्हा पत्नी व मुलाला आणण्यासाठी विंग येथे गेले. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते आगाशिव नगर येथील आपल्या घरी आले असता, घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी दरवाजा उघडून आतमध्ये जावून पाहिले असता, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांना बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला म्हणून पाहिले असता, कपाटाच्या लॉकरमधील १ लाख २० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याचे दिसले. यामध्ये साडेतीन तोळ्यांचा राणीहार, १४ हजारांचे डोरले, १२ हजार रूपयांचे कानातील टॉप्स, १० हजार रूपयांचे कानातील वेल असा एकूण १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला आहे. अक्षय पाटील याने शहर पोलिसात चोरीची फिर्याद दिली असून, अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.