सातारा : सातारा शहरातील जिल्हा क्रीडा संकुल ते शाहूपुरी चौक या प्रवासादरम्यान चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम व शासकीय कागदपत्रे असा मिळून दीड लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी आसमा रशीद शेख (रा. तामजाईनगर, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसात ते पावणे नऊच्या दरम्यान चोरीची ही घटना घडली आहे. क्रीडा संकुल ते शाहूपुरी चौकाजवळील प्रवासादरम्यान हा ऐवज नेला. तक्रारदारच्या सॅकमध्ये ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १२ ग्रॅम वजनाची सोन्याची बॉक्स चेन, ५ ग्रॅमची अंगठी, ३ ग्रॅमची सोन्याची दुसरी नारंगी खडा असणारी अंगठी, कानातले जोड, चांदीचे पैंजण, एक मोबाईल, रोख रक्कम, आईचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन व मतदान कार्ड, बँकेचे पासबुक, रुग्णालयातील बिले, न्यायालयीन कागदपत्रे असा ऐवज अज्ञात चोरट्याने नेला आहे. एकूण १ लाख ५६ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याचे तक्रारी म्हटले आहेत.
याप्रकरणी तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार माने हे तपास करीत आहेत.
.................................................................