सातारा : अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणे, अठरा वर्षांच्या आधी सोशल मीडियावर अकाउंट काढणे या बाबी बेकायदेशीर आहेत. याविषयी पालकांमध्ये जागृती नसल्यामुळे गुन्हेगारी मध्ये अल्पवयीन मुले येऊ लागली आहेत. यावर आळा घालण्यासाठी येथील गुरुकुल स्कूलने शक्कल लढवली आहे. आठवी ते दहावीत शिक्षण घेणारा शाळेतील कुठलाही विद्यार्थी गाडी चालवताना किंवा सोशल मीडियावर त्याचे अकाउंट असल्याचे उघडकीस आल्यास परीक्षेतील अंतर्गत गुण कमी करण्याचे ठरविले आहे. शाळेने पालकांना पाठविलेल्या या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
साताऱ्यात अल्पवयीन मुले आणि त्यांच्या हातून घडणाऱ्या बेकायदेशीर गोष्टी यांबाबत जागृती करण्याच्या निमित्ताने ‘लोकमत’ने नात्यांचा बाजार ही वृत्तमालिका प्रसिध्द केली होती. या मालिकेची दखल घेऊन शाळेने विद्यार्थ्यांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून राेखण्यासाठी ही शक्कल लढवली आहे. याबाबत दिलेल्या पत्रात शाळेच्यावतीने पालकांनाही समज देण्यात आली आहे. पाल्य एेकत नसेल आणि शाळेने निर्देशित केलेल्या सुचनांचे पालन होणार नसेल तर पालकांनी थेट शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहनही संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.