सचिन काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे; परंतु पोलिसांनाही अनेकजण चकवा देऊ लागलेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कोणी मेडिकल तर कोणी दवाखान्याचे कारण पुढे करत मोकाट फिरत आहे. त्यामुळे हतबल झालेले पोलीस कर्मचारीही आता ‘तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही जिवाचं रान करतोय मग तुम्हीही सहकार्य करा की’ अशी आर्त हाक देऊ लागले आहेत.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वर्षभरापासून आरोग्यपूर्ण लढा सुरू आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवांना वेळेचे बंधन घातले आहे. तर इतर सर्व उद्योग, व्यवसाय बंद ठेवले आहेत. नागरिकांनाही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडावे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, नागरिक तसेच वाहनधारक नियमांचे सातत्याने उल्लंघन करताना पाहायला मिळत आहेत.
अनेक वाहनधारक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाजारपेठेत फेरफटका मारत आहेत. पोलिसांनी अडवून विचारणा केल्यानंतर जवळपास ९० टक्के वाहनधारक ‘रुग्ण सिरीयस आहे, दवाखान्यात जायचं आहे, औषध आणायचे आहे’ अशीच कारणे पोलिसांना देत आहेत. त्यामुळे नक्की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय? असा प्रश्न पोलिसांना पडत आहे. कोरोनाचे संकट गंभीर असल्यामुळे पोलिसांनी अशा वाहनधारकांना सोडून द्यावे लागत आहे. मात्र, हा प्रकार शहरात सातत्याने घडत असून, यावर कुठेतरी अंकुश लावणे गरजेचे बनले आहे.
(चौकट)
विनाकारण एखाद्यावर कारवाई नको...
सातारा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक असली, तरी काही वाहनधारकांच्या अडचणी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असतात. काहीजणांना खरोखरच रुग्णालय, मेडिकल व इतर अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर सातत्याने पडावे लागत आहे. त्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीवर कारवाई नको, यासाठी पोलिसांनादेखील थोडी नमती भूमिका घ्यावी लागत आहे.
(चौकट)
फसवणूक केल्यास गुन्हा दाखल : विठ्ठल शेलार
बहुतांश वाहनधारक दवाखान्याच्या जुन्या फायली सोबत घेऊन बाजारपेठेत फेरफटका मारत आहेत. त्यामुळे पोलिसांनी फाईलींची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांची फसवणूक करून जर कोणी विनाकारण घराबाहेर पडत असेल, खोटी माहिती देत असेल तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिला आहे. दरम्यान, नागरिक व वाहनधारकांनी स्वतःसह इतरांच्या सुरक्षेचीदेखील काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
(पॉईंटर)
कारणे देणाऱ्यांचे प्रमाण
मेडिकलचे कारण : ४० %
दवाखाना : ३० %
डबा : १० %
नोकरी / कामकाज : ५ %
कोणतेच कारण नाही : १५ %
फोटो मेल :
सातारा शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. (छाया : जावेद खान)