मल्हारपेठ : नवारस्ता येथे औषध दुकानास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने व राहते घर जळून खाक झाले. यामध्ये २५ लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी पहाटे घडली. याबाबत माहिती अशी की, नवारस्ता येथील बसस्थानकासमोर असलेल्या औषध दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीची झळ तीन दुकानगाळ्यांसह लागूनच असलेल्या हिराबाई दत्तात्रय पाटील यांच्या राहत्या घरालाही बसली. आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घरामधील सर्वजण पहाटेच्या साखरझोपेत असताना अशोक पाटील यांना अचानक जाग आली. त्यावेळी त्यांना औषधाच्या दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आहे. त्यांनी घरातील सर्वांना जागे करून आगीच्या घटनेची माहिती दिली. घरातील सर्वांना घरातून बाहेर आणून आरडाओरडा केला. शेजारच्या लोकांना जागे केले. शेजाऱ्यांनी अग्निशामक दल व पोलिसांना कळविले. तसेच वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही दूरध्वनी केला. या आगीत सोनाली माथणे यांच्या ओमसाई औषध दुकानाचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. हिराबाई पाटील यांचे निणाई किराणा स्टोअर्स, राजाराम ठोंबरे यांचे सलूनचे दुकान, लागूनच असणाऱ्या अशोक पाटील, शंकर पाटील, प्रकाश पाटील, हिराबाई पाटील यांच्या राहत्या घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. यामध्ये कपडे, धान्यसाठा, महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा समावेश आहे. सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग पहाटेच्या सुमारास लागल्याने कोणीतरी उसाच्या पाचटीचा फड पेटविला असावा, असा प्रथम ग्रामस्थांचा समज झाल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, ग्रामस्थांचा आरडाओरडा झाल्याने घटनास्थळाकडे धाव घेतली. तीन दुकानगाळे व राहते घर लाकडी व पत्र्याचे असल्याने आगीत संपूर्ण घर व घरातील प्रापंचिक साहित्य, धान्यसाठा, अंथरूण, कपडे व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. पाटणचे नायब तहसीलदार विजय माने यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. (वार्ताहर)
नवारस्ता येथे तीन दुकाने खाक
By admin | Published: January 25, 2016 1:01 AM