प्रमोद सुकरे -- कऱ्हाड -सातारा जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात उंडाळे गावची वेगळी ओळख आहे. ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अनेक वर्षे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात वरचष्मा ठेवला होता; पण सध्याचा काळ त्यांना साथ देईना झालाय. अनेक वर्षे अभेद्य ठेवलेला दक्षिणचा गडही ढासळला आहे. आणि पुतण्याच्या बंडखोरीमुळे भाऊबंदकी सुरू झालीय. त्यामुळे येऊ घातलेली येळगाव-उंडाळे जिल्हा परिषद निवडणुकीतील लढत उंडाळकर घराण्यातील दोन भावांच्यात होणार की इतरांना संधी मिळणार? याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.जिल्हा परिषदच्या गटाचं नाव येळगाव असलं तरी इथलं राजकारण उंडाळेभोवतीच फिरतं. गेले अनेक दिवस जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाची प्रतीक्षा साऱ्यांनाच लागून राहिली होती. बुधवारी ती संपली. येळगाव जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला. तर दोन्ही पंचायत समिती गणांमध्ये ओबीसी आरक्षणे पडली. त्यामुळे इथं लढत कोणाच्यात होणार, याची चर्चा तर होणारच. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ हा उंडाळकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आणि उंडाळे-येळगाव जिल्हा परिषद गट हा त्यातला एक सक्षम बुरुज होता. उंडाळकरांच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत एकदा उंडाळे जिल्हा परिषद गटाचे मताधिक्य वाढायला लागले की ते पुन्हा विरोधी उमेदवाराला कमी करताच यायचे नाही. पण गत विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य कमालीचे घटले. आता तर अॅड. आनंदराव पाटील-उंडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने घरच फुटले, अशी स्थिती निर्माण झाली असून, आगामी जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर येथे भाऊबंदकीतील पहिली लढत पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.अॅड. आनंदराव पाटील यांनी यापूर्वी पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तर गेली साडेचार वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून ते कार्यरत होते. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र, येळगाव जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तेच राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित मानले जातात. अॅड. आनंदराव पाटील विरुद्ध अॅड. उदय पाटील अशी उंडाळकर बंधूतच लढत पाहायला मिळेल, असे काही जाणकारांचे मत आहे. या परिसरातील लोकांचे उंडाळकर परिवारावर प्रेम आहे. अशावेळी या परिवारातील एकच उमेदवार रिंगणात असला तर विरोधी उमेदवाराला लोक किती प्रतिसाद देतील ते सांगता येत नाही.पण विधानसभा निवडणुकीतील दावेदार असणारे अॅड. उदय पाटील जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरणार का? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधूनही अनेकजण इच्छुकयेळगाव-उंडाळे गटातील निवडणूक राष्ट्रवादी, विलासराव पाटील गट व काँग्रेस अशी तिरंगी झाली तर काँग्रेसमधूनही अनेकजण इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला या भागातून मिळालेल्या चांगल्या मतांमुळे त्यांचे मनोबलही वाढले आहे. जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्यात अण्णा जाधव (टाळगाव), पोपट पाटील (जिंती), नितीन थोरात (सवादे), तानाजी चौरे (साळशिरंबे) यांची नावे चर्चेत आहेत. तर मनसेच्या इंजिनमध्ये बसून विश्वजित पाटील निवडणूक लढवणार म्हणतायत.काकांच्या मनात दडलंय काय?पुतणे अॅड. आनंदराव पाटील यांच्या बंडखोरीनंतर काका विलासराव पाटील-उंडाळकर यांनी ‘ब्र’ शब्दही काढलेला नाही. एका पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत छेडले असता या विषयाला त्यांनी बगल दिली. त्यामुळे काकांच्या मनात दडलंय काय, याचा थांगपत्ता कोणालाच लागेना झालाय. जिल्हा परिषद निवडणुकीत पुतण्याच्या विरोधात ते मुलाला उभे करतील की अन्य कोणाला संधी देतील, हे कोणालाच सांगता येत नाही.पंचायत समितीसाठी उमेदवारांचा शोधया गटातील येळगाव पंचायत समिती गण ओबीसी महिलेसाठी तर सवादे गण ओबीसी पुरुषासाठी राखीव आहे. येथून कोण-कोण उमेदवार असू शकते, हे सध्या तरी सांगता येत नाही. पण येळगाव, येवती, सवादे, साळशिरंबे या मोठ्या गावांतूनच चांगल्या उमेदवारांचा शोध घेऊन मगच नावे निश्चित केली जातील.
भावाभावात रंगणार लढत की इतरांना संधी ?
By admin | Published: October 07, 2016 9:58 PM