लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : हणमंतवाडी, ता. फलटण व परिसरातील पुलांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप शिंदेनगर परिसरातील नागरिकांनी केला आहे. येथील तीन पूल वाहून गेल्याने या भागांतील ग्रामस्थांच्या दळणवळण सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बांधकामाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख राहुल देशमुख यांनी पत्रकाद्वारे केली आहे.शिंदेनगर, ता. फलटण येथील दहिगाव-आसू रस्त्यावरील भगतपूल, दलितवस्तीलगतचा पूल आणि शिंदेनगर शिवेवरील पुलासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून सदरचे पूल उभारण्यात आले. मात्र, हा खर्च पाण्यात गेल्याचे नमूद करीत, या पुलांच्या बांधकामाबाबत वारंवार सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे पूल वाहून गेले असून, त्यामुळे सुमारे १० हजार लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी तातडीने या पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.लवकरच पालकमंत्री विजय शिवतारे यांना भेटून या प्रश्नांची माहिती देणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पावसात तीन पूल गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:00 AM