शिरवळ(मुराद पटेल)- पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या आंबेगाव खुर्द येथील पुणे परिसरामध्ये ई-कचऱ्याचे ठेका घेणारे ठेकेदार बुधवार दि.१६ नोव्हेंबरपासून घरामधून काहीही न सांगता बेपत्ता झाले आहे. दरम्यान,संबंधित ठेकेदार यांनी पुणे जिल्ह्यातील सारोळा गावच्या हद्दीमध्ये आपली कार लावल्याचे व पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या व आत्महत्येसाठी प्रसिद्ध झालेल्या सारोळा ब्रिजवर संबंधिताची मध्यभागी चप्पल आढळल्याने संबंधित ठेकेदाराने नीरा नदीपात्रामध्ये उडी मारल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून भारती विद्यापीठ पोलीस व नातेवाईकांकडून नीरा नदीपात्रामध्ये शिरवळ रेस्क्यू टिम व स्थानिक मच्छिमार यांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात येत आहे.यामध्ये विजय परशुराम सुनगार (वय ३७,रा.विद्या सरोवर,जांभूळवाडी रोड,आंबेगाव खुर्द,पुणे) असे बेपत्ता झालेल्या ई-कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचे नाव आहे.
याबाबतची घटनास्थळावरून व पुणे पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पुणे याठिकाणी जांभूळवाडी रोडवरील आंबेगाव खुर्द याठिकाणी विजय सुनगार हे कुटूंबियांसमवेत राहण्याकरिता आहे. दरम्यान,बुधवार दि.१६ नोव्हेंबर रोजी विजय सुनगार हे सायंकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान घराच्या परिसरातून कोणालाही काहीही एक न सांगता दूरध्वनी बंद करून तसेच रात्री १० वाजेपर्यंत घरी न आल्याने कुटूंबियांनी शोधाशोध केली परंतू विजय सुनगार यांचा दूरध्वनी न लागल्याने व शोधाशोध करूनही ते न मिळाल्याने विजय सुनगार यांचे बंधू अजय सुनगार यांनी पुणे शहर येथील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला धाव घेत विजय सुनगार हे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली.
दरम्यान,भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारती विद्यापीठ पोलीस व नातेवाईक हे शोध घेत असताना बेपत्ता असलेले विजय सुनगार यांची कार (क्र.एमएच-१२-सीके-४४३६) हि पुणे जिल्ह्यातील सारोळा येथील एका प्रसिद्ध हॉटेलसमोर लावण्यात आली असल्याचे व संबंधित विजय सुनगार यांची चप्पल पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या व आत्महत्येचे माहेरघर बनलेल्या सारोळा पुलाच्या मध्यभागी आढळून आल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान,ठेकेदार असणाऱ्या विजय सुनगार यांनी सारोळा पुलावरून नीरा नदीपात्रामध्ये उडी मारल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यादृष्टीने भारती विद्यापीठ पोलीस व नातेवाइकांकडून नीरा नदीपात्रामध्ये शिरवळ रेस्क्यू टिम व स्थानिक मच्छिमार यांच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात येत असून अंधार झाल्याने संबंधितांकडून शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. या घटनेची अजय सुनगार यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस हे करीत आहे.