दत्ता यादवसातारा : लोकसभेची बाजी कोण मारणार, यावरून सध्या गावोगावी चर्चा पाहायला मिळत आहेत. राजकारणाची चर्चा करता करता एकमेकांचा तोल सुटत आहे. आमचाच पक्ष विजयी होणार, असे दावे केले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडत असल्याचे पाहायला मिळतेय.लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे. सर्वच पक्षांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. आपलाच पक्ष कसा विजयी होईल, यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना गावोगावी सध्या यात्रांचा हंगामही सुरू आहे. मुंबई, पुण्याला गेलेले चाकरमानी गावी आले आहेत. या चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांमध्ये सध्या राजकीय चर्चा पाहायला मिळत आहे. गावातील यात्रेच्या कार्यक्रमातही कोणाचेही लक्ष नाही. केवळ राजकारणावरच एकमेकांमध्ये चर्चा केली जात आहे. प्रत्येकजण सध्याच्या राजकारणावर आपापले मत व्यक्त करीत आहे. हे मत व्यक्त करताना मात्र, एकमेकांचा तोल सुटत आहे.अक्षरश: हमरीतुमरीही होत आहे. अशाच प्रकारे एका गावात रात्री भजनाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात काही तरुण दिल्लीच्या राजकारणावर चर्चा करीत होते. त्यातील एक तरुण त्याच्या आवडीच्या राजकीय नेत्याचे गुणगान गात होता, तर दुसरा तरुण तो नेता व त्याची पार्टी कशी पडणार, हे इतरांना पटवून देऊन सांगत होता. हे त्या नेत्यांचं गुणगान गाणाऱ्या तरुणाला पटलं नाही. त्यानं थेट त्याच्या कानशीलात लगावली. पुढे भजन सुरू असताना मागे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. हा वाद मिटण्याऐवजी वाढतच गेला. जोरजोरात, आरडाओरडा करत एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली.पण पुढे गम्मत अशी घडली, ज्या तरुणाच्या कानशीलात मारली, तो तरुण आरडाओरडा करतच ‘तुझा नेता या निवडणुकीत आपटणार आहे. परत तो कधीच निवडणुकीला उभा राहणार नाही. त्याला तोंड दाखवायला जागा पण उरणार नाही,’ असे बोलू लागला. हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अरे पुढे भजन सुरू असताना तुमचं हे काय चाललंय? तुमचं राजकारण गेलं चुलीत, असे काही गावकऱ्यांनी त्या तरुणांना सुनावले. तेव्हा कुठे राजकीय चर्चा थांबल्या.
शाब्दिक वाद पोलिस ठाण्यापर्यंत..राजकीय चर्चेवरून एका गावात घडलेला किस्सा हा एकमेव नसून अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. हे शाब्दिक वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. कोणताही पक्ष निवडून येऊ द्या, तुम्ही समोरासमोर चर्चा, मतं व्यक्त करू नका, असा सल्ला दोन्ही तक्रारदारांना पोलिसांकडून दिला जातोय.