सातारा : इतर देशांमध्ये कायदे किती कडक आहेत. आपल्याकडे देखील असे कायदे लागू करून चोरी करणाऱ्यांची बोटे छाटून टाका, बलात्कार करणाऱ्यांचे काहीही छाटून टाका. बघूया गुन्हा करण्याचे धाडस कोण करतोय? अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.सातारा नगरीचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या २७३ व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील मराठा पॅलेस येथे गुरुवारी दुपारी आयोजित कार्यक्रमानंतर खा. उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत छेडले असता ते म्हणाले, 'आज कायदा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे अशा घटना कशा रोखता येतील? एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यास तो पोलिसात जातो. पैशांच्या जोरावर आपल्या बाजूने चांगला वकील उभा करतो. मग ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असा व्यक्ती करणार तरी काय?स्त्री म्हणजे आदिशक्ती असं आपण म्हणतोय; परंतु तिला जपण्याचं कामही आपल्याला करायला हवं. आज अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना वाढतायत. बाहेर देशात कायदे कडक आहेत. तिथे चोरी करणाऱ्यांचे हात छाटले जातात. आपल्याकडे असे कायदे लागू करून बलात्कार करणाऱ्यांचं काहीही छाटून टाका, बघूया गुन्हा करण्याचे धाडस कोण करतोय? आज लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला असल्याचे ते म्हणाले.सीमावाद मिटायला हवामहाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाबाबत खा. उदयनराजे म्हणाले, या वादात महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांची काय चूक आहे. सर्वात जास्त त्रास या लोकांनाच सहन करावा लागत आहे. माणुसकीच्या नात्याने सीमावादाचा प्रश्न तातडीने मार्गी लागायला हवा.
Udayanraje Bhosale: कायदाच शिल्लक राहिलेला नाही, अत्याचार करणाऱ्यांचे..; उदयनराजे संतापले -video
By सचिन काकडे | Published: December 15, 2022 3:57 PM