सातारा : ऐन पावसाळ्याच्या काळात परळी, कास व ठोसेघर परिसरातील गावांमध्ये बीएसएनएलच्या मोबाइलला रेंज मिळत नाही. सातत्याने रेंज जात असल्यामुळे बीएसएनएलने त्यावर तत्काळ उपाययोजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, अशा इशारा ठोसेघर परिसरातील नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी दिला आहे.सातारा व जावळी तालुक्यातील अनेक गावे आहेत. या ठिकाणी फक्त बीएसएनएलला रेंज मिळते. त्यात परळी, ठोसेघर व कास परिसराचा मोठ्या प्रमाणात समावेश होत आहे. या भागात घरोघरी बीएसएनएलचे सीम कार्ड वापरले जाते. विद्यार्थीही बीएसएनएल सीम कार्ड वापरतात. ठोसेघर, कास हे पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. वर्षभर त्या ठिकाणी राज्यभरातून पर्यटकांची ये-जा सुरू असते. त्यांना येथे केवळ बीएसएनएलला रेंज आहे, हे माहीत नसल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाशी, नातेवाइकांशी येथून संपर्क साधता येत नाही. विशेष म्हणजे चार चाकी वाहन बंद पडल्यास पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणावर अडचण होत असून, रेंजअभावी कोणाशीही संपर्क साधता येत नाही.चाळकेवाडी येथील पठारावर असणाऱ्या पवनचक्क्यांवर स्थानिक युवक मोठ्या प्रमाणावर काम करतात. त्यांनाही रेंज न मिळाल्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू होत असून, शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. शाळाही सुरू होणार आहेत. त्यात रेंज नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. बीएसएनएल कंपनीच्या मनमानी कारभाराला ठोसेघरसह परिसरातील नागरिक कंटाळले असून, बीएसएनएलच्या नावाने या भागात ओरड सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठोसेघर परिसरात बीएसएनएलचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कारभार सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत बीएसएनएलचा टॉवर सुरू न झाल्यास मंगळवारी सकाळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसएनएलच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना काळे फसणार आहे. - राजू भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य