सणबूर : ढेबेवाडीपासून पाच किलोमीटर डोंगरावर वसलेल्या पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी गावातील गावकऱ्यांना चार महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुमारे ५३० लोकसंख्या असलेल्या लोकांना गाव परिसरातील विहिरीतून दोन दिवसांतून दोन ते तीन घागरी पाणी मिळत आहे.
यावर्षी कडक उन्हाळा पडल्यामुळे ढेबेवाडी परिसरातील डोंगरी भागातील गावात असलेल्या विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. वाडी-वस्तींसह गावामधील सर्व पाण्याचे स्त्रोत आटले असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. याकडे प्रशासनाकडून मात्र पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे.
अंब्रुळकरवाडी या गावामध्ये आडव्या पाठाचे (ग्रॅव्हिटी) पाणी पाईपद्वारे गावामध्ये आणून एका टाकीमध्ये जमा करून गावाला पाणी पुरवठा केला जातो. परंतु हे पाणी डिसेंबर महिन्यामध्ये जरवर्षी संपते. गावामध्ये बोअरवेल, आड, विहीर आहेत. परंतु त्यातून चार दिवसांमधून एकदा पिण्यासाठी दोन पाण्याचे हंडे मिळतात. ग्रामस्थांचा तात्पुरत्या स्वरुपात विहिरीतील पाण्यापासून पिण्याचा प्रश्न भागतो. परंतु जनावरांसाठी इतर खर्चासाठी पाणी टंचाईला सामोरे जावे लागतेअंब्रुळकरवाडी गावामध्ये दोन बोअरवेल आहेत. त्याचेही पाणी खोलवर गेले असल्या कारणाने तेही मिळणे गावकऱ्यांना कठीण बनले आहे. सध्या अंब्रुळकरवाडी येथील ग्रामस्थांचा एका विहिरीवरून तसेच कूपनलिकेद्वारे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसाबसा भागत आहे. परंतु जनावरांना पिण्यासाठी व खर्चासाठी पाणी कमी पडत आहे.
गावकऱ्यांकडून अनेकवेळा ग्रामपंचायतीमार्फत अधिकाºयांकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागातील अधिकाºयांकडून दुर्लक्ष केले जात आहे. गावासाठी पाण्याचे टँकर चालू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.पाण्यासाठी वणवण लागतंय फिरायलापाण्यासाठी आम्हाला खूप पायपीट करावी लागत असून, चार दिवसांतून चार हंडे पाणी मिळते. परंतु जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने जनावरे सोडून द्यायची वेळ आली आहे. दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जायचं आणि रात्री पाण्यासाठी डोंगरात भटकायचं. त्यात जंगली प्राण्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील ग्रामस्थांतून सांगितले जात आहे.गावातील गावकºयांसह पाळीव जनावरांनाही दररोज पिण्यासाठी व खर्चासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यक भासते. कारण गावातील जनावरे व लोकांची संख्या पाहिल्यास गावची लोकसंख्या ५३० आहे. तसेच गाई-म्हशी १५०, शेळ्या ३०, कोंबड्यांची संख्या पाचशेहून अधिक आहे.
ग्रामपंचायतीमार्फत डिसेंबर महिन्यांमध्येच गावास पाण्याचा टँकर मिळावा, यासाठी निवेदन दिले आहे. मार्चअखेर कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत असून, संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहेत.- तानाजी अंब्रुळकर,ग्रामपंचायत सदस्य, अंब्रुळकरवाडी, ता. पाटण