सातारा : जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात कमाल तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचते. यंदा मात्र, पारा ४० अंशापुढे गेलाच नाही. त्यामुळे सातारा जिल्हावासीयांनी कडक उन्हाळा अनुभवलाच नाही. तसेच यावर्षी उकाड्याची तीव्रताही कमीच जाणवली.
सातारा जिल्ह्याचे दोन भाग प्रामुख्याने समजले जातात. पूर्व भाग दुष्काळी. या भागात माण, खटाव, फलटणसारखे तालुके, तर पश्चिम भाग समृध्द समजला जातो. पाण्याची उपलब्धता चांगली असते. दरवर्षी मार्च महिना उजाडताच जिल्ह्यात उन्हाळा सुरू होतो. हळू-हळू पारा वाढतो. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात कमाल तापमान अनेकवेळा ४० अंशावर जाते. कधी कधी तर ४३ अंशांचा टप्पाही पार होतो. यामध्ये सातारा शहरात आणि पूर्व भागातील तापमानात एक ते दोन अंशाचा फरक पडतो. पूर्व भागातील तापमान नेहमीच अधिक असते. असे असले तरी जिल्ह्यात यावर्षी तापमान कमीच राहिले. त्यामुळे कडक उन्हाळा पडलाच नाही.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून उन्हाळ्याची तीव्रता सुरू झाली. पण, तापमान कमीच राहिले. याला कारण म्हणजे यावर्षी उन्हाळ्यात वळवाचे अनेक पाऊस पडले. त्यातच सतत चार-पाच दिवस पाऊस होत होता. यामुळे ढगाळ वातावरण तसेच पावसामुळे पारा कमीच राहिला. आता तर पावसाळा तोंडावर आला आहे. वारे वाहत आहेत. यामुळे उन्हाळ्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. यापुढेही पारा ४० अंशाच्या पुढे जाईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे सातारा जिल्हावासीयांना यंदा एकप्रकारे सुखद उन्हाळाच अनुभवास मिळाला, असेच म्हणावे लागेल.
चौकट :
पारा एकदाच ३९ अंशावर...
जिल्ह्यात मार्च महिन्यात कमाल तापमान वाढत होते. त्यावेळी अनेक दिवस ३६ अंशाच्या वर पारा होता. तसेच सातारा शहरात दि. २६ मार्चला ३८.०१ तापमान होते. त्यानंतर २८ मार्च रोजी ३८.०५, २९ मार्चला ३८.०९ आणि ५ एप्रिलला ३९.०२ तापमानाची नोंद झाली. ३९.०२ हेच या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान राहिले. मे महिन्यात तर बहुतांशी वेळा ३६ अंशाखालीच पारा राहिला. एक दिवस तर तापमान २६ अंशापर्यंत खाली आले होते. यामुळे यावर्षी कडक उन्हाळा जाणवलाच नाही.
.............................................................