लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोना मृतांचे कागदोपत्री आकडे वेगळे आणि प्रत्यक्षात पोर्टलवर आकडे वेगळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आकड्यांमध्ये ५७५ कोरोना मृतांची पोर्टलवर नोंदच नाही. परिणामी शासनाकडे चुकीचे आकडे पोहोचत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. सध्या एक हजारहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये घरोघरी लोक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रोजच्या रोज रुग्णालयातील माहिती जिल्ह्याच्या ठिकाणी दिली जाते. त्यामुळे दिवसाचा कोरोनाबाधितांचा आकडा प्रशासनाला समजत असतो. त्यानंतर हा आकडा पोर्टलवर जाहीर केला जातो. अशी एकंदरीत प्रशासनाची पद्धत आहे. परंतु खासगी रुग्णालयातून वेळेवर माहिती फॉर्ममध्ये भरली जात नाही. त्यामुळे साहजिकच पोर्टलवर उशिरा माहिती मिळत आहे. काही खासगी हॉस्पिटलचे व्यवस्थापन दहा ते पंधरा दिवस कोरोना मृतांची माहिती देतच नाही. परिणामी पोर्टलवर चुकीचा आकडा देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेतील कोरोना वाॅर रूममध्ये सध्या १३ कर्मचारी काम करत आहेत. हे कर्मचारी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असतानाच त्यांना ग्रामीण व शहरी भागातून वेळेवर माहिती दिली जात नाही. त्यामुळे कोरोना मृतांच्या आकड्यांमध्ये तफावत जाणवत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सध्या ३२२३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. असे असताना पोर्टलवर केवळ २६४८ अशी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये ५७५ मृतांची तफावत दिसून येत आहे.
चौकट :
जीपची वाॅर रूम
जिल्हा परिषदेतील वाॅर रूममध्ये सध्या १३ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना केवळ जिल्ह्यातून येणारी मृतांची आणि कोरोनाबाधित यांची आकडेवारी पोर्टलवर भरण्याचे काम देण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांकडून रोजच्या रोज पोर्टलवर माहिती भरली जात आहे. परंतु या कर्मचाऱ्यांकडे जिल्ह्यातून विविध रुग्णालयांतून येणारी माहिती वेळेवर येत नाही. काही हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून दहा ते बारा दिवसांनंतर कोरोना मृतांची माहिती दिली जात असल्याचे या रूममधून सांगण्यात आले. परिणामी पोर्टलवर चुकीचे आकडे आणि तफावत दिसून येत आहे.
चौकट:
पालिका वाॅर रूम
सातारा पालिकेच्या वाॅर रूममध्ये तीन कर्मचारी कार्यरत असून, हे कर्मचारी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी नोंद करून घेतात. तसेच शहरातील उपलब्ध बेड, रेमडेसिविर, कोण दगावले असेल त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचवणे... अशा प्रकारची कामे या वाॅर रूममधून केली जात आहेत.
चौकट:
...तर फटका बसू शकतो
पोर्टलवर कमी मृतांची नोंद होत असल्यामुळे आकडेवारीनुसार केलेल्या उपाययोजनांमध्ये फटका बसू शकतो. गंभीर स्थिती असतानाही त्याची नोंद न होण्याची शक्यता बळावत आहे.
रुग्णसंख्या कमी झाली म्हणून यंत्रणा गाफील राहू शकते. वास्तविक रुग्णसंख्या वाढलेली असेल तर त्याचे मोठे परिणाम जनतेला भोगावे लागतील.
नागरिकांमध्येही प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. बाधितांच्या आणि मृतांच्या आकडेवारीत तफावत असणे म्हणजे नागरिकांना संभ्रमात टाकण्यासारखे आहे.
कोट:
पोर्टलवर अचूक माहिती झेडपीतील वाॅर रूममधील कर्मचारी भरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालये तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयांतून दोन दोन दिवस माहिती दिली जात नाही. ही माहिती उशिरा येत असल्यामुळे पोर्टलवरील आकड्यांमध्ये तफावत दिसून येते.
- अनिरुद्ध आठले, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा
चौकट :
ही पाहा आकड्यांतील तफावत...
जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यू - ३२२३
पोर्टलवरील नोंद - २६४८
चौकट:
सर्वाधिक बळी साताऱ्यात
कोरोनाने अक्षरशः सातारा शहरात थैमान घातले आहे. सातारा शहर व परिसरात तब्बल ७८६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हजार ९७९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात कमी ४१ मृत्यू हे महाबळेश्वर तालुक्यात झाले आहेत.