सातारा : ‘कोयना धरणग्रस्तांच्याच पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मग भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनावर कसा विश्वास ठेवायचा? तसेच पुनर्वसन करायचे असेल तर कोयनेचं पाणी ज्या भागात गेलं आहे, तेथेच करावं. उपाशी मरण्याच्या ठिकाणी नको,’ अशी आग्रही मागणी करतानाच एकप्रकारे इशाराही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाला दिला.
दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणग्रस्तांना स्थानबद्ध केल्याचा निषेधही केला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी शरद जांभळे, हरिश्चंद्र दळवी, संतोष गोटल, चैतन्य दळवी, आदी उपस्थित होते.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याला इतिहास आहे. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात जिल्हा हाती शस्त्रे घेऊन लढला. अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पाटण तालुक्यात येणार होते. त्यावेळी कोयना धरणग्रस्तांमधील काहीजणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. लोकशाहीला घातक असाच हा प्रकार झाला; कारण, राज्याच्या मागील ४० वर्षांच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. अधिकार आहे म्हणून चिरडणे व मुस्कटदाबीचाच हा प्रकार करण्यात आला. अशा घटना यापुढेही घडणार असतील तर महाराष्ट्रातील जनता याला प्रतिकार करील.
अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील ढोकावळे, मीरगाव, आंबेघर गावांत भूस्खलन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूस्खलन धोका असणाऱ्या गावांचे पुनर्वसन करण्याचे स्पष्ट केले आहे. पण, पाटण तालुक्यातील कोयना धरणग्रस्त २३ गावांचेच पुनर्वसन अजून झालेले नाही. या २३ गावांमधील काही गावे दरडीचा धोका असणारी आहेत. त्यामुळे पुनर्वसन कसे करणार? शासनावर कसा विश्वास ठेवावा? लोकांच्या विश्वासास पात्र बना; तरच सर्वांचा तुमच्यावर विश्वास बसेल, असेही डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.
..............................................................