लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : मुख्यमंत्री आल्याशिवाय माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच कऱ्हाड तालुक्यातील कासारशिरंबे येथील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या वाहनाखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय. मात्र, या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून गुरूवारी दिवसभरात एकाही अधिकाऱ्याने संबंधित शेतकऱ्याकडे याबाबत साधी विचारणाही केलेली नाही. करमाळा तालुक्यातील वीट गावात धनाजी जाधव या कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. मुख्यमंत्री आल्याशिवाय माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, अशी अखेरची चिठ्ठी संबंधित शेतकऱ्याच्या खिशात आढळून आली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला असून कर्जमाफीसाठी शेतकरी आणखी आक्रमक झालेत. अशातच कऱ्हाड तालुक्यातील कासारशिरंबे येथील शेतकरी अशोक लोहार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्याबाबतचे निवेदन त्यांनी २० एप्रिल २०१६ रोजीच मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अशोक लोहार यांनी पुन्हा एकदा असेच निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे. प्रांताधिकारी, कऱ्हाड शहर व कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात त्यांनी या निवेदनाच्या प्रत दिल्या आहेत. संबंधित कार्यालयात हे निवेदन स्विकारण्यातही आले आहे. तसेच त्याची पोहोचही लोहार यांना देण्यात आली आहे. या गंभीर इशाऱ्यानंतर अशोक लोहार यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विचारणा होईल, असे वाटले होते. मात्र, गुरूवारी दिवसभरात एकाही अधिकाऱ्याने त्यांना साधी विचारणाही केलेली नाही. गुरूवारी लोहार स्वत:हून पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांची भेटही घेतली. मात्र, कोणत्याच अधिकाऱ्याने त्यांना आत्महत्येच्या इशाऱ्याबाबत काहीही विचारले नाही, हे विशेष.
आत्महत्येच्या इशाऱ्याचं सोयरसुतकही नाही..!
By admin | Published: June 08, 2017 11:10 PM